नवी दिल्ली : राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपने विजय मिळवल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत बैठका सुरु झाल्या आहेत. जुन्या चेहऱ्यांऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. तिन्ही राज्यात भाजपने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आधी जाहीर केला नव्हता. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी अनेक दावेदार आहेत. भाजपने 2014 ची ट्रीक वापरत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावरच या निवडणुका लढवल्या होत्या. आता विजय मिळवल्यानंतर मुख्यमंत्री निवडण्यासाठी पक्षाकडून बैठका घेतल्या जात आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, भाजप राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधे नव्या चेहऱ्यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देणार आहे. केंद्रात जरी भाजपचे ज्येष्ठ नेते नेतृत्व करत असतील पण तरीही नव्या चेहऱ्यांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची देण्यात यावी असे सांगण्यात ये असल्याची माहिती आहे. दुसरीकडे राजस्थानमध्ये वसुंधरा राजे, मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान आणि छत्तीसगडमध्ये रमण सिंह, या तिन्ही नेत्यांनी किमान दोनदा आपापल्या राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. यावेळीही त्यांची नजर मुख्यमंत्रिपदावर खिळली आहे.
या नेत्यांची नावे चर्चेत
राजस्थानमध्ये अलवरचे खासदार बालकनाथ योगी, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, खासदार दिया कुमारी यांची नावे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत पुढे आली आहेत. मध्य प्रदेशातही सर्वांच्या नजरा शिवराज सिंह चौहान यांच्याकडे लागल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून रमण सिंह यांनी अनेकवेळा सांगितले आहे की, त्यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय भाजपचे केंद्रीय नेतृत्व घेईल.