नागपूर : विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला दारुण पराभव पत्करावा लागला. लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभेला काँग्रसची चांगलीच धूळधाण झालेली आहे. काँग्रेसचे अवघे 16 उमेदवार विजयी झाले आहेत. त्यानंतर आता काँग्रेसमध्ये वादाचे खटके उडू लागले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एजंट असल्याचा आरोप आता त्यांच्याच पक्षातून उघडपणे होऊ लागला आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला विधानसभेत मोठ्या विजयाची अपेक्षा होती. विदर्भात काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली होती. त्यामुळे विदर्भातील 62 जागांपैकी महाविकास आघाडी आणि काँग्रेसला यश मिळेल अशी आशा होती. मात्र, महायुतीने काँग्रेस, महाविकास आघाडीचा चांगलाच धुव्वा उडवला आहे. त्यानंतर आता काँग्रेसमध्ये वाद उफाळून आला असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.
नागपूरमध्यचे काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांनी नाना पटोलेंवर गंभीर आरोप केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आरएसएसचे एजंट असल्याचा आरोप बंटी शेळके यांनी केला. आरएसएस मुख्यालय परिसरात प्रियांका गांधींचा रोड शो असताना सुद्धा नाना पटोले यांच्या इशाऱ्यावर संघटनेने मदत केली नसल्याचा आरोप सुद्धा बंटी शेळके यांनी केला आहे. मला राहुल गांधींनी थेट उमेदवारी जाहीर केली असताना. मात्र, तरी सुद्धा नाना पटोले यांनी संघटनेला माझ्या प्रचारापासून दूर राहण्याचा सूचना केली होती, असा खळबळजनक आरोप बंटी शेळके यांनी केला आहे.
विधानसभेतील निराशाजनक कामगिरीमुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पक्षातंर्गत टीकेला सामोरे जावे लागत आहे. काँग्रेसला विदर्भात चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र, त्यांना हवे तसे यश मिळाले नाही. नाना पटोले हे स्वत: केवळ 212 मतांनी विजयी झाले आहेत.