Nagpur News : नागपूर : सन्मानाने जगण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे. मात्र, आपल्या समाजातील गैरसमजुतीमुळे आजही तृतियपंथी समुदायाला तुच्छ नजरेने बघितले जाते. कॉलेजमध्ये एखादा असा मुलगा शिकत असेल, तर त्याला त्रास दिला जातो. त्यांच्या संवेदना, सुप्त कलागुण, त्यांच्यातील माणूस जाणून घेण्याचा प्रयत्न कधी होत नाही. प्रत्येक माणसात वेगळेपण असते. हे वेगळेपण जपत आपल्या कर्तृत्वाचा ठसा निर्माण केल्यास समाजात मानसन्मान मिळतो. याच भावनेतून नागपुरात मुद्रा डान्स ग्रूप अस्तित्वात आला. आज या ग्रूपच्या माध्यमातून ५० हून अधिक तृतीयपंथी कलाकार लोकांचे मनोरंजन करत आहेत. समाजाने उपेक्षित घटक म्हणून हिणवले, तरी आपली कलाच आपली ताकद बनेल, या विश्वासावर हे कलाकार लोकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत.
उपेक्षित म्हणून हिणवले; पण कला पाहून भारावले…!
कर्तव्य म्हणून प्रत्येकाने उपेक्षित आणि दुर्लक्षित घटकांप्रती सामाजिक जाणिवेतून काम केले पाहिजे. तृतीयपंथीयांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल झाला पाहिजे, हे मुद्रा ग्रूपच्या कलाकारांनी दाखवून दिले आहे. या कलाकारांच्या मते, प्रत्येकात एक कलाकार दडलेला असतो. (Nagpur News ) आम्हाला ईश्वराने वेगळे निर्माण केले आहे. स्त्रियांप्रमाणेच सौंदर्य आम्हालाही दिले आहे. आमच्याही अंगी विविध कला आहेत. या कला लोकांपुढे सादर करता याव्यात. या भावनेतून आम्ही एकत्र येत डान्स ग्रूप तयार करण्याचा निर्णय घेतला.
डान्स ग्रूप तयार करण्यापूर्वी आम्ही श्रद्धा जोशी यांच्याशी चर्चा केली. सात जणी एकत्र येऊन ममत्त्व फाउंडेशनअंतर्गत मुद्रा डान्स ग्रूपची स्थापना केली. त्यानंतर आता ५० हून अधिक तृतीयपंथी भगिनी या ग्रुपमध्ये आहेत, असे मोहिनी हिने सांगितले. आमच्यामधील प्रत्येक व्यक्ती ही आपापल्या क्षेत्रात एक उत्तम कोरिओग्राफर, डान्सर, अॅक्टर, मॉडेल आहे. तसाच तो वेगवेगळ्या क्षेत्रात काम करून आपल्यातील कला जोपासत आहे. (Nagpur News ) मी स्वतः एक तृतीयपंथी समाजसेवक म्हणून काम करते, असेही मोहिनीने सांगितले.
कलाकाराचा सन्मान हेच या ग्रूपचे ध्येय आहे. लिंग, जात, धर्म यावरून येथे भेदभाव होत नाहीत. फक्त कलेला वाव दिला जातो. नागपूरातील साउथ सेंट्रल झोन येथे त्यांनी पहिले प्रात्यक्षिक सादर केले. (Nagpur News ) त्यानंतर कला क्षेत्रातील अनेक धागे उलगडत गेले. कुरुक्षेत्र येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवात देखील या कलाकारांनी कला सादर केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतील खासदार सांस्कृतिक महोत्सव येथे आयोजित केला होता. येथे या कलाकारांचे तोंडभर कैतूक झाले.
आपल्या कलेच्या माध्यमातून या कलाकारांनी आज स्वतःला सिद्ध केले आहे. समाजाने देखील आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून निसर्गाच्या निर्मितीचा स्वीकार करावा, अशी नम्र भावना या कलाकारांनी व्यक्त केली.