पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयाचे माजी डीन डॅा. संजीव ठाकुर यांना अटक करण्याची मागणी आमदार रविंद्र धंगेकर यांनी केली आहे. ठाकुर यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांना परवानगी मागून २५ दिवस होऊनही सरकारने परवानगी दिलेली नाही. त्यामुळे आमदार रविंद्र धंगेकर यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
रविंद्र धंगेकर म्हणाले की, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पुणे पोलिसांनी संजीव ठाकूर यांच्यावर कारवाई करण्यासाठी परवानगी मागितली होती, पण ती नाकारण्यात आली असल्याची माझी माहिती आहे. हसन मुश्रीफ स्वतः ईडीची कारवाई टाळण्यासाठी सरकारमधे जाऊन बसले आहेत, त्यांच्याकडून संजीव ठाकुरांवर कारवाई होईल ही अपेक्षा ठेऊ शकत नाही, अशी टीका रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.
मुश्रीफ यांनी परवानगी नाकारुन कारवाईची फाईल मुख्यमंत्र्यांकडे पाठवली आहे. मुख्यमंत्र्यांनी ठाकुर यांच्यावर कारवाई करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. कारवाई करण्यास परवानगी दिली नाही तर, रस्त्यावर उतरुन आंदेलन करणार असल्याचा इशारा आमदार धंगेकर यांनी दिला आहे. हसन मुश्रीफ ठाकुर यांना पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोपही धंगेकर यांनी केला आहे.