Mumbai-Pune Expressway : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर तब्बल ३२ तासांच्या महाकोंडीनंतर काही तासांपूर्वीच प्रवाशांना दिलासा मिळाला होता. मात्र हा दिलासा अल्पकाळाचा ठरला. पुन्हा एकदा द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचा संयम सुटत आहे आणि हा मार्ग पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे.

४ ते ५ किलोमीटरपर्यंत वाहतूक रांग
खोपोली ते अमृतांजन पुलादरम्यान ४ ते ५ किलोमीटर लांबीची वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या लेनवर वाहनांची गती अत्यंत संथ असून, पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरही ३ ते ४ किलोमीटरची रांग लागली आहे. परिणामी प्रवाशांना तासन्तास गाडीतच अडकून राहावे लागत आहे.
विकेंड + निवडणूक हालचालींचा परिणाम
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू असलेली वर्दळ आणि विकेंडमुळे वाढलेली प्रवासी संख्या, या दोन्ही घटकांचा थेट परिणाम द्रुतगती मार्गावर दिसून येत आहे. त्यातच बोरघाट सेक्शन सुरू असल्याने मुंबईहून पुण्याकडे येणारी वाहने अतिशय हळूहळू पुढे सरकत आहेत.
पोलिसांचे वाहतूक व्यवस्थापन, पण प्रवाशांचा त्रास कायम
कोंडी कमी करण्यासाठी महामार्ग पोलिसांकडून विशेष वाहतूक नियोजन राबवले जात आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या दोन्ही लेनवर अर्ध्या तासाचा ब्लॉक घेतला जात आहे. या काळात पुणेकडील वाहतूक दोन्ही लेनवरून सोडली जाते, तर मुंबईकडील वाहतूक थांबवली जाते. नंतर ही वाहने खंडाळा बोगद्याबाहेर पुन्हा पुणे लेनमध्ये समाविष्ट केली जातात.
तसेच, मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या अवजड वाहनांना दोन तास थांबवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. खालापूर टोलनाका आणि अमिटी युनिव्हर्सिटी परिसरात ही वाहने रोखली जात असून, घाट विभागात हलक्या वाहनांना लवकर मार्ग मिळावा हा यामागचा उद्देश आहे. मात्र या उपाययोजनांनंतरही प्रवाशांचा वेळ, इंधन आणि मानसिक त्रास टळलेला नाही.
‘मिसिंग लिंक’कडूनच खरा दिलासा?
मुंबई-पुणे दरम्यान सुरू असलेला ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प हा या कोंडीवरचा दीर्घकालीन उपाय मानला जात आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर जुना महामार्ग आणि द्रुतगती मार्गाला एक प्रभावी पर्याय उपलब्ध होणार असून, घाट विभागातील कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. सरकारकडून यंदा मे महिन्यापर्यंत मिसिंग लिंक सुरू करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले जात आहे.
तोपर्यंत मात्र पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील प्रवाशांना वारंवारच्या कोंडीचा सामना करावा लागणार, हे वास्तव नाकारता येणार नाही. वारंवार निर्माण होणारी ही स्थिती आता केवळ गैरसोय न राहता, दैनंदिन प्रवासावर परिणाम करणारी गंभीर समस्या बनली आहे.







