केडगाव ( पुणे ) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू होताच तलाठी कार्यालयात उत्पन्न दाखला घेण्यासाठी महिलांची एकच झुंबड उडाली होती. त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र व उत्पन्न दाखल्याची अट शिथिल करण्यात आली. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांचे आरोग्य व पोषण सुधारावे आणि त्याच्या कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी’ मुख्यमंत्री- माझी लाडकी बहिण ‘योजना सुरू केली आहे. परंतु या योजनेबाबत जनजागृतीचा अभाव असल्याने सर्वत्र गोंधळाची परिस्थिती आहे. शिवाय, अर्जप्रक्रिया ‘ऑनलाइन’ आणि ‘ऑफलाइन’ अशा दोन्ही स्वरुपाची असल्यामुळे महिलांमध्ये संभ्रम आहे.
ही राज्य सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असल्याने त्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: लक्ष देऊन आहेत. योजनेमध्ये बदल झाल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती. या योजनेत सहभागी होण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी बराच कालावधी शिल्लक असला तरी अर्ज प्राप्त करण्यासाठी महिलांची गर्दी होत आहे. तसेच या योजनेचे मोबाईल ॲप डाऊनलोड केल्यानंतर अनेकांना लॉगिन करता आले नाही.
नारीशक्ती हे ॲप सुटसुटीत आहे परंतु ग्रामीण भागात रेंज नसल्यामुळे किंवा इतर कारणामुळे हे ॲप सुरू होण्यास वेळ लागत असल्याचा अनुभव अनेक महिलांना येत आहे. तसेच ॲप सुरु झाले तर भरलेली संपूर्ण माहिती आपोआप डिलीट होत आहे. यामुळे अर्ज घेण्यासाठी ग्रामीण भागातील महिला ग्रामपंचायत, अंगणवाडी सेविकांकडे वळाले आहेत. परंतु अंगणवाडी सेविका तो अर्ज ऑनलाईन अपलोड करत असताना फोटोसाठी पुन्हा एकदा हेलपटा मारावा लागणार की काय? असे अनेक संभ्रम ग्रामीण भागातील महिलांच्या मनामध्ये निर्माण होत आहेत.
लाडकी बहिण योजनेतून दरमहा दीड हजार रुपये मिळणार असल्याने अनेक महिलांनी अर्ज भरण्याची तयारी केली आहे. पण, सध्या अर्ज केवळ अंगणवाड्यांमध्येच स्वीकारले जात आहेत. बहुतेक महिला अशिक्षित असून त्यांच्याकडे ॲन्ड्राईड मोबाईल नाहीत. त्यामुळे त्या महिला ऑफलाइन अर्ज भरून अंगणवाड्यांमध्ये देत आहेत. अंगणवाडी सेविका ऑनलाइन अर्ज करत असताना फोटो साठी पुन्हा एकदा जावे लागेल काय?