पुणे : MPSC औषध निरीक्षक (गट-ब) भरती प्रक्रियेतील पेपर फुटीचे प्रकरण सध्या जोरदार चर्चेत आले आहे. एका अनोख्या ‘लव्ह स्टोरी’मुळे हा संपूर्ण प्रकार घडल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले असून, या घटनेमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, एका प्रियकराने MPSC मधील एका खालच्या कर्मचाऱ्याशी संपर्क साधून परीक्षेचा पेपर मिळवला. प्राथमिक तपासानुसार हा पेपर केवळ एकाच विद्यार्थ्यापर्यंत पोहोचला होता. हा गैरप्रकार समोर आल्यानंतर MPSC ने मंगळवारी रात्री औषध निरीक्षक पदाची संपूर्ण भरती प्रक्रियाच रद्द केली.वर्षानुवर्षे हाल सोसून आणि कठोर परिश्रम करून परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचा या एका चुकीमुळे नाहक बळी गेला आहे.

ही भरती प्रक्रिया विद्यमान अध्यक्षांचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वीच पार पडली होती, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन या घोटाळ्याबाबत महत्त्वाचे पुरावे सादर केले होते.त्यानुसार 22 मार्च 2026 रोजी झालेल्या या परीक्षेचे प्रश्न नंदुरबार येथील कौटिल्य अकादमीच्या एका विद्यार्थ्याला 20 मार्च रोजीच मिळाले होते.

पैसे मिळाल्यानंतर संबंधित व्यक्ती व्हॉट्सॲपवर प्रश्न पाठवायचा आणि 2 ते 3 मिनिटांत ते ‘डिलिट फॉर ऑल’ करायचा.डाऊनलोड केलेले प्रश्न एका विद्यार्थ्याने त्याच्या मित्राला पाठवल्यामुळे याचे थेट पुरावे समोर आले.सुरुवातीला MPSC ने हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. मात्र, आता थेट भरती प्रक्रिया रद्द केल्याने या परीक्षेत मोठा गैरप्रकार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.







