छत्रपती संभाजीनगर: कुणाल चांदगुडेच्या मृत्यूनंतर या प्रकरणातील अनेक पैलू समोर येत आहेत. कुणालच्या छोट्या मावशीने त्याची आई संगिता यांच्या सासरच्या मंडळींवर आरोप केल्यानंतर आता संगिताची मोठी बहीणही समोर आली आहे. कुणालला त्याचे वडील नको होते, अशी चर्चा आतापर्यंत होत होती. मात्र, वस्तुस्थिती त्यापेक्षा वेगळी असल्याचा दावा त्याच्या मोठ्या मावशीने केला आहे. कुणालला आपल्या वडिलांची गरज होती आणि त्यांना पुन्हा घरी आणण्याची त्याची इच्छा होती, असे तिने सांगितले.

मावशीच्या म्हणण्यानुसार, महिनाभरापूर्वी कुणालची आई संगितासोबत झालेल्या वादानंतर त्याचे वडील मुरलीधर हे पत्नी आणि मुलापासून वेगळे राहत होते. त्यानंतर कुणाल वडिलांना पुन्हा घरी आणण्यासाठी प्रयत्न करत होता. वडील भावनिक होऊन आपल्याकडे परत येतील, अशी त्याची अपेक्षा असावी, असेही मावशीने सांगितले.

काही दिवसांपूर्वी कुणाल आणि त्याच्या वडिलांमध्ये फोनवरून संवाद झाला होता. या संभाषणात कुणालने वडिलांना, “तुम्ही मला सोडून कसे जाऊ शकता, माझ्याकडे परत या,” असे म्हटल्याचे मावशीने सांगितले. मात्र, वडिलांनी आपल्या आई-वडिलांसह बहिणीचा उल्लेख करत सध्याच्या परिस्थितीबाबत त्याच्याशी चर्चा केली होती. या घटनेनंतर कुणाल तणावात असल्याचे मावशीच्या लक्षात आले होते.

तिने स्वतः कुणालशी बोलून त्याला समजावण्याचा प्रयत्न केल्याचेही सांगितले. आयुष्यात अशा कौटुंबिक अडचणी येत असतात, त्यातून मार्ग काढता येतो, असे तिने त्याला समजावले होते. मात्र, तो वडिलांना पुन्हा घरी आणण्यासाठी प्रयत्न करतच होता. कुणाल एवढे टोकाचे पाऊल उचलेल, याची कल्पनाही नव्हती, असे मावशीने भावुक होत सांगितले.
अचानक कुणालचा फोन आला आणि “मी चाललोय, मला माफ करा,” असे त्याने सांगितल्याचे मावशीने म्हटले. त्यानंतर काही वेळातच सर्व काही संपल्याचे ती सांगते. कुणालवर त्याचे आई-वडील दोघेही प्रेम करत होते. ते त्याच्यासोबत राहत नसले तरी त्यांच्यातील प्रेम कायम होते, असा दावाही मावशीने केला. कुणालला काही झाल्याचे समजल्यावर त्याच्या वडिलांचीही अवस्था अत्यंत बिकट झाली असती, असे सांगताना मावशीला अश्रू अनावर झाले.






