पुणे : रखरखत्या उन्हात एक तरुण जोडपे रामटेकडी येथील परीक्षा केंद्रावर घाईघाईने पोहचले वेळ होती दुपारी दीडचीआईच्या कुशीत तीन ते चार महिन्यांचे बाळ होते. परीक्षा हॉलमध्ये जाताना आईने बाळाला पित्याच्या स्वाधीन केले. मात्र, बाळ रडू लागले. तेव्हा बंदोबस्तावर असणाऱ्या दोन महिला पोलिसांनी आनंदाने त्या बाळाला कडेवर घेऊन दोन तास त्याला खेळवले आणि कर्तव्यासोबतच या बाळाला मायेचा ओलावा दिला.
पुण्यातील हडपसर परिसरात असणाऱ्या रामटेकडी परिसरातील परीक्षा केंद्रावर एका चार महिन्यांच्या बाळाचा सांभाळ करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचे सध्या सोशल मीडियावर चांगलाच कौतुक होताना दिसून येत आहे.
पुणे महापालिकेच्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. बुधवारी (ता. ०५) दुपारी विधी अधिकारी पदासाठी रामटेकडी येथील एका केंद्रावर परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला अनेक विवाहित महिला देखील परीक्षेसाठी बसल्या होत्या. तसेच काही गरोदर महिलासोबत काही महिला लहान बाळांना सोबत घेऊन आल्या होत्या.
परीक्षा केंद्रावर बुधवारी दुपारच्या वेळेत चार महिन्यांचे बाळ घेऊन एक जोडपे परीक्षा केंद्रावर आले होते. केंद्रात परीक्षा देणाऱ्यांशिवाय कुणालाही प्रवेश नव्हता. त्यात परीक्षा केंद्राच्या आजूबाजूच्या परिसरात सावलीत बसण्यासाठी झाड देखील नव्हते. त्यामुळे अशा परिस्थितीत बाळाला घेऊन कुठे बसायचे हा प्रश्न बाळाच्या वडीलांसमोर होता. काही वेळानंतर सुरक्षा रक्षकाने बाळाला घेऊन केंद्राच्या जवळच्या परिसरात बाळाला घेऊन बसण्यास सांगितले.
मात्र, बाळ रडायला लागले. ते वडिलांना देखील त्याच रडू थांबवता येइना, तेव्हा परीक्षा केंद्रावर असणाऱ्या महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्या बाळाला आपल्या कुशीत घेऊन त्याच्यासोबत खेळले. त्याच्या आईची परीक्षा संपेपर्यंत त्या बाळाला मायेची ऊब देण्याचा प्रयत्न केला. कर्तव्यावर असताना महिला पोलिसांनी माणुसकी जपत त्या बाळाला सांभाळ केला.