पुणे : पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणानं सर्वत्र खळबळ उडाली असून याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना अटक केली आहे.सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.आरोपी सिया गोयलला कठोरता कठोर शिक्षा दिली जावी, अशी मागणी सर्वत्र होत आहे. देशभरातून केतनला न्याय मिळावा, असा एकच सूर ऐकू येत असताना एका डॉक्टर महिलेनं मात्र केतन अग्रवाल प्रकरणाची खिल्ली उडवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

एका संतापजनक पोस्टद्वारे हिंसेचं समर्थन करणाऱ्या डॉ. मुस्कान सोनी या डेंटल डॉक्टर तरुणीवर ऑल इंडिया डेंटल स्टुडंट्स अँड सर्जन्स असोसिएशननं AIDSA कठोर कारवाई केली आहे. या डॉक्टर महिलेवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच, पाच वर्षांसाठी तिचं निलंबन करण्यात आलं आहे.

केतन अग्रवालच्या दुर्दैवी मृत्यूनंतर, डॉ. सोनी यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या घटनेची थट्टा करणारी एक ‘स्टोरी’ पोस्ट केल्याचा आरोप आहे. संघटनेनं ही पोस्ट अत्यंत आक्षेपार्ह, अपमानजनक आणि संघटनेच्या नैतिक मूल्यांशी विसंगत असल्याचं म्हटलं आहे.
दुसरीकडे सियाचा भाऊ साहिल गोयल याने केलेल्या एका दाव्यामुळे या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. साहिलच्या म्हणण्यानुसार, सिया या लग्नामुळे खूप आनंदात होती आणि तिला केतनसोबतच तिचे आयुष्य जगायचे होते. ती केतनसोबत तासनतास व्हिडिओ कॉलवर बोलायची आणि त्यांच्या प्री-वेडिंग फोटोशूटचे नियोजन करत होती. तिने स्वतःसाठी आवडती गाणी आणि सुंदर लोकेशन्सही निवडून ठेवले होते.
पुढे तो म्हणाला, “सियाने माझी शपथ घेऊन सांगितले होते की, तिचा चेतनशी आता कोणताही संबंध नाही आणि ती फक्त केतनसोबतच लग्न करेल. तिच्या या शपथेवर विश्वास ठेवून मी तिच्या आणि चेतनच्या जुन्या नात्याबद्दल घरात कोणालाच काही सांगितले नव्हते असे साहिल गोयल याने सांगितले.
दरम्यान सिया आणि चेतन लॉकअपमध्ये वेगवेगळे बहाणे करून स्वतःला निष्पाप दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, पोलिसांच्या तपासानुसार, सिया आणि चेतनला लग्न करायचे होते, पण सियाचे लग्न केतनशी ठरले होते. याच रागातून त्यांनी केतनला संपवण्याचा कट रचला आणि १८ जून रोजी लोहागड किल्ल्यावरून ढकलून त्याची निर्घृण हत्या केली.






