छत्रपती संभाजीनगर: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुस्लिमीन (एमआयएम) ची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली, अशी घोषणा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी एक्सद्वारे केली. राज्यातील महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून एमआयएमची मजबूत बांधणी करण्यासाठी एमआयएम नवीन कार्यकारिणी तयार करणार आहे.
विधानसभा निवडणुकीत एमआयएमला एकाच जागेवर यश मिळाले, तर तीन जागांवर थोड्या मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्यासाठी एमआयएमने कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपावरून डॉ. गफ्फार कादरी यांनी कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्याचवेळी विधानसभा लढण्यासाठी इच्छुक असलेले समीर बिल्डर यांनाही उमेदवारी मिळाली नव्हती. त्यामुळे ते नाराज होते. त्यानंतर इम्तियाज जलील यांनी जाहीर कार्यक्रमात समीर बिल्डर यांना विधानसभा निवडणुकीनंतर मोठी जबाबदारी देऊ, असे जाहीर केले होते. पक्षाची ताकद वाढवण्यासाठी इम्तियाज जलील हे राज्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. राज्याचा दौरा आटोपल्यानंतर सर्व माहिती पक्षप्रमुखांना देतील. त्यानंतर नवीन कार्यकारिणीची घोषणा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी करणार आहेत. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष कार्यकारिणीकडे लागले आहे.
सर्व समाजाला संधी देणार
एमआयएम नवीन कार्यकारिणीत सर्वांना संधी देणार आहे. सोशल इंजिनीअरिंगचा फॉर्म्युला या कार्यकारिणीत दिसणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. सर्वच समाजातील नवीन तरुण चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. विशेष म्हणजे ही जॅम्बो कार्यकारिणी असणार आहे. त्यामुळे मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण सर्व ठिकाणी कार्यकर्त्यांना या कार्यकारिणीत सामावून घेतले जाणार आहे.