पुणे : महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागातर्फे 15 ते 21 ऑगस्ट 2026 दरम्यान राज्यभरात ‘जलसंधारण सप्ताह’ साजरा केला जात आहे. माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 21 ऑगस्ट रोजी जलसंधारण दिनाचे औचित्य साधून ‘महा वॉकेथॉन’ आणि ‘जलसंधारण शपथ’ असे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. या सप्ताहाचे मुख्य आकर्षण म्हणजे राज्यातील 15 ते 30 वयोगटातील तरुण-तरुणींसाठी आयोजित केलेली ‘रील्स स्पर्धा’.

डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून माती आणि पाणी वाचवण्याचा संदेश घराघरांत पोहोचवणे हा या स्पर्धेमागचा मुख्य उद्देश आहे. सहभागी होण्यासाठी तरुणांना 30 ते 60 सेकंदांचा व्हिडिओ तयार करून तो स्वतःच्या सार्वजनिक इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करावा लागेल.

स्पर्धेची प्रमुख वैशिष्ट्ये आणि नियम:

पात्रता: महाराष्ट्रातील 15 ते 30 वर्षे वयोगटातील युवक-युवती.
नियम: रीलच्या सुरुवातीला नाव, जिल्हा आणि व्हिडिओचा उद्देश सांगावा. पोस्ट करताना विभागाच्या अधिकृत अकाऊंटला टॅग करणे आणि #SaveSoilSaveWater हा हॅशटॅग वापरणे बंधनकारक आहे.
सुचवलेले विषय: माती व पाणी संवर्धन, पावसाचे पाणी साठवणे, शेततळी, बंधारे, धूप रोखणे, वृक्षारोपण आणि गावातील यशस्वी जलसंधारण कार्य.
बक्षिसे: प्रत्येक जिल्ह्यात प्रथम क्रमांकास ₹25,000, द्वितीय ₹15,000 आणि तृतीय क्रमांकास ₹10,000 सह सन्मानचिन्ह दिले जाईल. विजेत्यांना “युवा मृद-जलदूत” पदवी आणि सर्व पात्र स्पर्धकांना ई-प्रमाणपत्र मिळेल.
मूल्यमापन पद्धती (एकूण 100 गुण):
विषय व सामाजिक संदेश: 50 गुण (विषय संदेश 30 + सामाजिक प्रभाव 20)
सर्जनशीलता व तांत्रिक बाजू: 40 गुण (कल्पकता 25 + सादरीकरण 15)
सोशल मीडिया प्रतिसाद (Engagement): 10 गुण
विजेत्यांची निवड केवळ लाईक्सवर अवलंबून न राहता तज्ज्ञांच्या परीक्षणाद्वारे केली जाईल. “एक रील… मातीसाठी!, एक रील… पाण्यासाठी!, एक रील… सुरक्षित भविष्यासाठी!” या आवाहनासह अधिकाधिक तरुणांनी यात सहभाग घ्यावा.







