उरुळी कांचन : दारूचा धंदा उधळायला गेलेल्या उरुळी कांचंन पोलिसांवरच दारूमाफियांनी दुचाकी घालून जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तिघांवर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात तीन आरोपींवर शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणासह विविध गंभीर कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत.

शिंदवणे (ता. हवेली) हद्दीतील कंजारभट वस्ती परिसरात कॅनॉलच्या शेजारी शनिवारी (ता. 15) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही झाडाझुडपात ही घटना घडली. अक्षय व्यंकट राठोड (वय -30), जगदीश संतोष राठोड (वय 19), कांतीलाल जवाहर राठोड (वय- 40, सर्व रा. काळेशिवार, कंजारभट वस्ती, शिंदवणे, ता. हवेली, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
या कारवाईत पोलिसांनी 1 लाख 20 हजार रुपये किमतीचे 1200 लिटर विषारी रसायन आणि दुचाकी असा एकूण 1 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, तीन आरोपींवर विविध गंभीर कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच शिंदवणे येथील काळेशिवार कंजारभट वस्तीजवळील कॅनॉलच्या उत्तर बाजूला झाडाझुडपात मोठ्या प्रमाणावर विषारी गावठी हातभट्टी दारू बनवण्याचे काम सुरू असल्याची बातमी उरुळी कांचन पोलिसांना मिळाली होती.

माहिती मिळताच पोलीस हवालदार कमलेश होले आणि पोलीस अंमलदार मनोज रत्नपारखी यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी छापा टाकला. तेथे जमिनीमध्ये दोन मोठे खड्डे खोदून त्यात प्रत्येकी 1 हजार लिटर क्षमतेचे दोन लोखंडी पत्राचे गोलाकार बॅरल भिजत घातले होते. यामध्ये फेसाळलेले, गुळाचे खडे, झाडाच्या साली व नवसागरयुक्त सुमारे बाराशे लिटर कच्चे विषारी रसायन आढळून आले.
पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी छापा टाकल्याचे दिसताच दारूधंदा चालवणारे आरोपी अक्षय राठोड, जगदीश राठोड आणि कांतीलाल राठोड यांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना “थांबा, पळू नका” असा इशारा दिला असता, आरोपींनी आपल्या ताब्यातील होंडा शाईन (MH 12 QN 6411) आणि दुसऱ्या एका विनानंबरच्या मोटारसायकलने पोलीस हवालदार कमलेश होले आणि अंमलदार मनोज रत्नपारखी यांना जोरदार धडक दिली.
दरम्यान, या धडकेत दोघेही पोलीस कर्मचारी खाली पडल्याने जखमी झाले. या कारवाईत उरुळी कांचन पोलिसांनी 1 लाख 20 हजारांचे 1220 लिटर विषारी रसायन आणि 20 हजार रुपये किमतीची होंडा शाईन गाडी असा एकूण 1 लाख 40 हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.
या प्रकरणी पोलीस हवालदार कमलेश शिवाजी होले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उरुळी कांचन पोलिसांनी वरील तिन्ही आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल खोमणे करत आहेत







