लहू चव्हाण
पांचगणी : जिल्हा बँकेच्या माध्यमातून सभासद, शेतकरी, महिला बचत गट यासह समाजातील विविध घटकांसाठी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. बॅंकेच्या सभासद अथवा तरुण उद्योजकांनी बॅंकेच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपूरे यांनी केले.
पांचगणी विकास सेवा सोसायटीची 65 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या कार्यक्रमात राजपुरे बोलत होते. यावेळी संस्थेचे चेअरमन शंकरराव कळंबे, दत्तात्रय महाराज कळंबे जावळी सहकारी बँकेचे संचालक अजित कळंबे, व्हा. चेअरमन शांताराम राजपुरे, समन्वय समिती माजी अध्यक्ष प्रवीण भिलारे, अंकुश मालुसरे, तुकाराम मालुसरे, नारायण बेलोशे, दांडेघरचे सरपंच जनार्दन कळंबे, विभागीय विकास अधिकारी आण्णा फरांदे आर. डी. मालुसरे, वसंतराव बेलोशे, अशोक राजपुरे, लक्ष्मण भिलारे, अशोक दुधाने, जिल्हा बँकेचे पांचगणी शाखा प्रमुख घनश्याम डोईफोडे, तालुका सचिव युवराज दुधाणे आदी उपस्थित होते.
राजपुरे पुढे म्हणाले सभासद आणि संस्था यांचेत समन्वय साधून सोसायटीच्या भरभराटीसाठी आम्ही प्रयत्नशील असून कर्जदार यांचेशी त्यांच्या घरी जावून समन्वय साधत १०० टक्के वसुलीसाठी प्रयत्न करणार आहोत. यासाठी ‘ सोसायटी आपल्या दारी ‘ हा उपक्रम राबवणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
आपण आतापर्यंत सामोपचाराने विनंती केली होती परंतु सबंधित ऐकत नसेल तर आपणाला आता याच महिन्यात जशास तसे उत्तर देवून गाळा ताब्यात घ्यावा लागेल यासाठी सर्व सभासदांनी सहकार्य करावे. असे संस्थेचे मालकीच्या गाळ्या संदर्भात बोलताना राजेंद्र शेठ राजपुरे म्हणाले
दरम्यान, यावेळी दत्तात्रय महाराज जावली सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाले बद्दल अजित कळंबे यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. सभासदांना दहा टक्के लाभांश जाहीर करण्यात आला.तसेच शेअर्स सर्टिफिकेट वाटप करण्यात आले.
यावेळी सभेस संस्थेचे सर्व संचालक, सभासद व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ताळेबंद पत्रक व नफातोटा पत्रकाचे वाचन सचिव सुरेश आंब्राळे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ विलास राजपुरे यांनी केले. तर जानू पांगारे यांनी आभार मानले.