माढा : जिल्हा परिषद शिक्षण विभाग व कुर्डूवाडी पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (8 जानेवारी) माढा येथे जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विठ्ठलवाडी येथील मोठ्या गटातील खेळाडू मेघश्री राजेंद्रकुमार गुंड हिने उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सोलापूर जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. तिला विस्ताराधिकारी शोभा लोंढे व केंद्रप्रमुख विजय काळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरविण्यात आले.
मेघश्री गुंड हिने चमकदार कामगिरीच्या जोरावर अनुक्रमे केंद्रस्तरीय, बीटस्तरीय व तालुकास्तरीय या तीनही ठिकाणच्या बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून ती जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी झाली होती. या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे परीक्षक म्हणून परमेश्वर सुरवसे व श्रीकांत काशीद यांनी उत्कृष्ट व पारदर्शक पद्धतीने कामकाज पाहिले. तिला सहशिक्षिका सुप्रिया ताकभाते, आई मेघना गुंड, मुख्याध्यापक सुभाष लोखंडे, गोरखनाथ शेगर, संजय सोनवणे, भारत कदम, ऐजिनाथ उबाळे, तानाजी खरात यांचे मार्गदर्शन लाभले. मेघश्री गुंड ही विठ्ठलवाडीचे आदर्श शिक्षक राजेंद्रकुमार गुंड यांची कन्या आहे.
प्रमाणपत्र व मेडल देताना जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे समन्वयक सुभाष राऊत, केंद्रप्रमुख फिरोज मनेरी, सुरेश माळी, विठ्ठलराव शिंदे प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे संचालक सुधीर गुंड, गोरखनाथ शेगर, बंडू कोळी, सुप्रिया ताकभाते यांच्यासह शिक्षक व खेळाडू उपस्थित होते.