Marathwada Sahitya Sammelan : छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. साहित्य संमेलनाचा आज पहिला दिवस आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचे पडसाद साहित्य संमेलनावरही पडताना दिसत आहे. मराठा समाजासाठी वेळ पडल्यास आम्ही राजीनामे द्यायला तयार असल्याचं आमदार प्रकाश सोळंके म्हणाले आहेत. तर मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी आपल्या भाषणातून शेतकरी आत्महत्या आणि मराठा आंदोलनाचा मुद्दा मांडल्याचे पाहायला मिळाले.
यावेळी बोलतांना ठाले पाटील म्हणाले की, “मराठवाड्यातील सर्वच मराठे हे कुणबी आहेत. मराठवाड्यातील आणि विदर्भातील मराठ्यांचे नातेसंबंध आहेत. ते जर कुणबी असतील तर मराठवाड्यातील मराठे कुणबी कसे नाहीत. मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण मिळत नाहीत. विदर्भातील वंशजांना आरक्षण मिळते, पण मराठवाड्यात मिळत नाही. यांच्या मुली तिकडे आणि त्यांच्या मुली इकडे दिल्या आहेत. पण आरक्षण मिळत नाही, हा कुठला न्याय आहे. मी भावनेपोटी बोलत नसून, हे माझे निरीक्षण असल्याचे ठाले पाटील म्हणाले.
आमदार प्रकाश सोळंके आक्रमक
आमदार प्रकाश सोळंके यांनी देखील मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडली आहे. “मागच्या तीन महिन्यांपासून जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनं सुरू आहे. आपल्या मुलांच्या दृष्टीने हा पोट तिडकीचा प्रश्न आहे आणि हा सुटला पाहिजे. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण दिलं पाहिजे. दोनदा प्रयत्न झाला आरक्षणाचा, एकदा राणे समिती आणि दूसर पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात. परंतु ते टिकलं नाही. आज महाराष्ट्रात एव्हढा मोठा मराठा जणसमुदाय गोळा केला त्यासाठी जरांगे पाटील यांना धन्यवाद दिलं पाहिजे. ज्यांच्या नोंदी आहे त्यांना कुणबी म्हणुन आरक्षण दिलं पाहिजे.