अजित जगताप
सातारा : मराठा समाजाला न्याय मिळावा. त्यांना स्वाभिमानाने राज्य शासनाने सवलती द्यावेत. यासाठी आवाज उठवणारे मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. शशिकांत पवार यांचे तसेच आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ पत्रकार बबन कांबळे यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांना सातारा जिल्ह्याच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.
ॲड. पवार यांनी पन्नास वर्षांपूर्वी मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता. त्यानंतर मराठा समाजातील काही नेत्यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आरक्षणाची मागणी केली होती.
माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील ॲड. शशिकांत पवार हे खरं म्हणजे जुन्या काळातील लढवायला नेते होते. शेवटपर्यंत मराठा समाजाला संधी मिळाली पाहिजे यासाठी ते क्रियाशील होते.
जेष्ठ पत्रकार बबन कांबळे हे सातारा जिल्ह्यातील डावरी (ता. पाटण) येथील रहिवाशी होते. वरळी बी डी डी चाळीतून त्यांनी आंबेडकरी चळवळीत स्वतःला झोकून दिले होते. ते उत्कृष्ट कबड्डीपटू होते.
तसेच गोदरेज कंपनीमध्ये नोकरी सोडून त्यांनी पत्रकारिता स्वीकारली दैनिक नवाकाळ उपसंपादक ते वृत्तपत्र सम्राटचे संपादक आणि अनेक आंबेडकर चळवळीतील योगदान त्यांनी दिल्यामुळे समाजातील नवोदित लेखकांना एक विचारपीठ निर्माण केले.
सातारा जिल्ह्याच्या वतीने दलित सेना प्रदेश संघटक प्रेमानंद जगताप, विनोद शिंदे, नितीन पाटील, डॉ संतोष देशमुख, सामाजिक कार्यकर्ते अजित साठे, डॉ संतोष मोरे, रिपब्लिकन पक्षाचे बबन मोरे, गणेश भोसले, वंचित बहुजन आघाडीचे अमोल गंगावणे, विजय ओव्हाळ, गौतमी मसणे व मान्यवरांनी त्यांच्या जीवन कार्याविषयी माहिती देऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
दोन महान नेत्यांचा आदर्श घेऊन राज्य सरकारने त्यांच्या नावाने विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना पुरस्कार देऊन गौरव करावा अशी मागणी जेष्ठ कार्यकर्ते अशोक बैले यांनी केली आहे.