Manoj Jarange Patil : जालना : मराठा आंदोलनासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी तब्बल नऊ दिवसांनंतर उपोषण सोडले. या दरम्यान, त्यांची तब्येत खालावली असून, उपोषण मागे घेतल्यानंतर त्यांना जालना येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील फोनद्वारे संवाद साधत मनोज जरांगे यांच्या तब्येतीची चौकशी केली. त्यानंतर जरांगे यांनी रूग्णालयातून माध्यमांशी संवाद साधत, माझी तब्येत आता ठणठणीत असल्याची माहिती दिली आहे. यामुळे मराठा समाज बांधवांनी समाधान व्यक्त केले.
जरांगे पाटील म्हणाले की, एक दिवस मला आराम वाटतो, तर दुसऱ्या दिवशी अचानक एखादा अवयव त्रास देतो. त्यामुळे कभी खुशी, कभी गम… अशी माझी स्थिती आहे. मराठा बांधवांनी माझी काळजी करू नये. मी येत्या काही दिवसांतच ठणठणीत बरा होऊन कामाला लागणार आहे. डिसेंबरपासून प्रत्येक गावागावात पुन्हा महाराष्ट्रभर साखळी उपोषण शांततेत सुरू करायचे आहे. न्यायाचा दिवस जवळ आला आहे. आपली शेतीतील कामे करत असताना आपल्या मुलांच्या भविष्याचा विषय डोक्यात ठेवायचा आहे, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले.
आंतरवालीसह महाराष्ट्रात साखळी उपोषण चालू आहे. मराठा बांधवांना आरक्षण मिळाल्याशिवाय ते थांबणार नाही. पुन्हा एक विनंती आहे की उद्रेक किंवा कायदा मोडेल असं कृत्य करायचं नाही. कोणीही कायदा हातात घेऊ नका. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका. जाळपोळ, मोडतोड करू नका, असे आवाहन त्यांनी मराठा आंदोलकांना केले.
आपण पुन्हा एकदा मराठा समाजाचा आशीर्वाद घ्यायला जायचे आहे. महाराष्ट्र दौऱ्याबाबत आज कार्यक्रम आखला जाईल. २४ डिसेंबर आरक्षणाची अंतिम तारीख आहे. तर दौरा उद्या-परवापासूनच सुरू होणार आहे, असंही ते म्हणाले.