पुणे, : आजार बरे करण्याचे आणि आर्थिक अडचणी दूर करण्याचे आमिष दाखवून सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या मनोहर भोसले (रा. लासुर्णे ता. इंदापूर) याला पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. काळी जादू, अघोरी विद्या आणि बाळूमामांचा आशीर्वाद असल्याचे सांगून त्याने अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचे समोर आले आहे. कुर्डुवाडी, बारामती, दौंड आणि करमाळा अशा विविध ठिकाणी त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका तरुण रिअल इस्टेट व्यावसायिकाला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मनोहर मामाने ‘अघोरी पूजे’चा बनाव रचला. २१ एप्रिल रोजी कुर्डुवाडी येथील एका हॉटेलमध्ये व्यावसायिकाला गाठून, “मनोहर मामांकडे काळी जादू आहे, ते तुम्हाला अडचणीतून बाहेर काढतील,” असा विश्वास एका अनोळखी व्यक्तीने दिला. त्यानंतर व्हिडिओ कॉलद्वारे झालेल्या संवादात मामाने पूजेसाठी २ लाखांची मागणी केली आणि 50 हजार रुपये करमाळ्यातील मठात देण्यास सांगितले. पैसे दिल्यानंतर मामाने संपर्क तोडल्याने फसवणूक झाल्याचे व्यावसायिकाच्या लक्षात आले आणि त्याने कुर्डुवाडी पोलिसांत धाव घेतली.

2021 मध्ये एका पीडित महिलेला मालिकेत काम मिळवून देतो असे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणी त्याने तुरुंगवासही भोगला आहे. बारामतीत एका कर्करोग रुग्णाला बरे करतो असे सांगून 2लाख 51 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे. तसेच दौंड पोलिसांनीही त्याच्यावर गुन्हा नोंदवला आहे. “माझी भक्ती करा, मणक्याचे आजार बरे होतील,” असे सांगून त्याने एका भक्ताकडून 50 हजार रुपये उकळले होते.
कोण आहे हा मनोहर मामा?
इंदापूर तालुक्यातील लासुर्णे गावचा रहिवासी असलेला मनोहर भोसले डी.एड.च्या परीक्षेत नापास झाला होता. सुरुवातीला आठवडा बाजारात सुके बोंबील विकून उदरनिर्वाह करणाऱ्या मनोहरने अचानक काही वर्षे गायब होऊन ‘बाळूमामांचा अवतार’ असल्याचे सांगण्यास सुरुवात केली. करमाळ्यातील उंदरगाव येथे त्याने मठ थाटला. राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांसोबतचे त्याचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय ठरले आहेत.
आश्रम बंद, कारभार पुण्याहून सुरू
ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर उंदरगाव येथील त्याचे बेकायदेशीर आश्रम बंद पडले होते. मात्र, तरीही त्याने आपली भोंदूगिरी थांबवली नाही. त्याने आपला कारभार पुण्यात हलवला होता आणि तिथूनच तो आपले जाळे पसरवत होता. मात्र, वाढत्या तक्रारींमुळे अखेर पोलिसांनी त्याला पुण्यातून जेरबंद केले आहे. अंधश्रद्धेला बळी न पडण्याचे आणि अशा भोंदू महाराजांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.







