वारजे: गणपती उत्सवानिमित्त वर्गणी गोळा करण्यावरून दोन सख्ख्या भावांनी बिल्डरच्या डोक्यात कुऱ्हाड घालून खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. ही घटना उत्तमनगर-शिवणे येथील मोरया रेसीडेन्सीच्या ऑफिसमध्ये 1 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली होती. या गुन्ह्यातील एका आरोपीला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने 5 लाखांच्या दंडासह 10 वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. हे आदेश जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी.पी.जाधव यांनी दिले आहेत.
जिवन सुरेश पवार (वय 20, रा. मिकोबा मोरे चाळ, सदगुरु कृपा हाईड्स, मोरे एम्पायर बोळीत, उत्तमनगर, पुणे) असे शिक्षा ठोठाविण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर चंद्रकांत रामचंद्र मोरे (वय 44, प्रचिती अपार्टमेंट फ्लॅट नं. 04, किर्ती नगर, वडगाव बु) असे हल्ल्यात जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मोरे यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार आरोपी जिवन पवार व त्याच्या अल्पवयीन भावावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चंद्रकांत मोरे हे एक बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांची उत्तमनगर-शिवणे परिसरात एक बांधकाम साईट सुरु होती. त्याच भागातील आखिल मोरे नगर मित्र मंडळाची मुले गणपती उत्सवा करिता वर्गणी मागण्यासाठी आली होती. वर्गणीच्या कारणावरुन फिर्यादी व आरोपींची शाब्दिक बाचाबाची झाली होती. दरम्यान, वर्गणीच्या झालेल्या वादातून आरोपींनी लाकडी दांडक्याची लोखंडी पाते असलेली कुऱ्हाड व दगडाने फिर्यादी मोरे यांना मारहाण केली. तर आरोपी जिवन पवार याने हातातील लाकडी दांडक्याचा कुऱ्हाडीने मोरे यांच्या डोक्यावर वार केले. आरोपींनी जाताना फिर्यादी यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
दरम्यान, या मारहाणीत मोरे हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. त्यांना दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर मोरे यांनी उपचार घेत असताना वरील जबाब दिला. त्यानंतर आरोपींच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा उत्तमनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी आरोपी जिवन पवार याला बेड्या ठोकल्या. तर त्याचा अल्पवयीन भावाला ताब्यात घेण्यात आले होते. त्याची रवानगी निरीक्षण गृह येरवडा पुणे येथे करण्यात आली.
सदर गुन्ह्याचा खटला हा पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात सुरु होता. या खटल्यात सरकारी वकील ॲड. नामदेव तरळगट्टी यांनी केलेले युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी जिवन पवार याला 10 वर्षाची सक्तमजुरी व ५ लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास आरोपीला आणखी सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठाविली आहे. या पाच लाख दंडापैकी तीन लाख रूपये दंड फिर्यादी यांना आरोपीने देणे आहे. असे आदेश जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी.पी.जाधव यांनी दिले आहेत.
या खटल्यात सरकारी वकील ॲड. नामदेव तरळगट्टी यांना उत्तमनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खांदरे, पोलीस निरीक्षक अर्जुन गोविंद बोत्रे , महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक चवरे, पोलीस हवालदार विनायक करंजावणे व महिला पोलीस अंमलदार प्रियंका रासकर यांची मदत मिळाली.