नागपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सध्या जोरात सुरू असतानाच महत्वाची माहिती समोर आली आहे. या विभागातील 32 लोकप्रतिनिधींपैकी तब्बल 14 आमदार आणि 2 खासदार या निवडणुकीत मतदान करू शकणार नाहीत. ज्या नेत्यांच्या हातात जिल्ह्याच्या राजकारणाची धुरा आहे, तेच स्वतः या निवडणुकीसाठी मतदार नसल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.

पदवीधर मतदारसंघाच्या नियमांनुसार, मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी संबंधित व्यक्ती पदवीधर असणे आवश्यक असते. मात्र, नागपूर विभागातील या 16 लोकप्रतिनिधींचे शिक्षण दहावी, बारावी किंवा पदवीच्या पहिल्या-दुसऱ्या वर्षापर्यंतच झालेले आहे. त्यामुळे त्यांना मतदारांच्या यादीत स्थान मिळालेले नाही.

या निवडणुकीत मतदानापासून वंचित राहणाऱ्यांमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, काँग्रेस नेते नाना पटोले, विजय वडेट्टीवार आणि माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम अशा बड्या दिग्गजांचा समावेश आहे. याशिवाय, रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे आणि राज्यसभेच्या खासदार माया इवनाते यांनाही पदवी पूर्ण नसल्याने मतदानाचा हक्क मिळालेला नाही.

जिल्ह्यानुसार मतदानास अपात्र लोकप्रतिनिधी व त्यांचे शिक्षण:
नागपूर: कृष्णा खोपडे (7 वी), चरणसिंह ठाकूर (12 वी), मोहन मते (ITI), प्रवीण दटके (डिप्लोमा 1 st Year) आणि चंद्रशेखर बावनकुळे (B.Sc 1 st Year).
भंडारा: राजू कारेमोरे (12 वी) व नाना पटोले (B.A. 2 nd Year).
चंद्रपूर: विजय वडेट्टीवार (10 वी) व किशोर जोरगेवार (10 वी).
गोंदिया: विनोद अग्रवाल (12 वी) व संजय पुराम (12 वी).
वर्धा: समीर कुणावार (12 वी) व राजेश बकाने (B.A. 1 st Year).
गडचिरोली: धर्मरावबाबा आत्राम (10 वी).
खासदार: माया इवनाते (5 वी) व श्यामकुमार बर्वे (B.A. 2 nd Year).
जनतेचे प्रतिनिधित्व करणारे हेच प्रमुख नेते शैक्षणिक अर्हतेच्या अटीमुळे या निवडणुकीच्या प्रक्रियेतून बाहेर राहिल्याचे स्पष्ट झाले आहे.






