पुणे: पुण्यातील औंध परिसरात पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी घडली. निलेश भाऊसाहेब पाटील हे पुणे शहर पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक (PSI) म्हणून कार्यरत होते. सध्या त्यांची नेमणूक विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात होती. दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांनी स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे पुणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, औंध परिसरात ही घटना घडली. गोळीचा आवाज ऐकू आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पोलीस पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. गंभीर अवस्थेत असलेल्या निलेश पाटील यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

निलेश पाटील यांनी एवढे टोकाचे पाऊल नेमके का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक वाद, कामाचा ताण, वैयक्तिक कारण किंवा अन्य कोणत्या कारणामुळे त्यांनी आत्महत्या केली का, याबाबत पोलीस सर्व शक्यता तपासत आहेत. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाने पाहणी करून आवश्यक पुरावे आणि माहिती संकलित केली आहे.

पोलिसांकडून घटनेच्या सर्व बाजूंनी तपास सुरू असून निलेश पाटील यांच्या कुटुंबीयांकडून आणि सहकाऱ्यांकडूनही माहिती घेतली जात आहे. कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या अशा आकस्मिक मृत्यूमुळे पोलीस दलात शोककळा पसरली आहे. आत्महत्येमागील नेमके कारण तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.







