पुणे : दक्षिण मुंबईतील उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ या घराबाहेर सापडलेली स्फोटकांनी भरलेली गाडी आणि व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला गेला आहे. मुंबईतील विशेष एनआयए (NIA) न्यायालयाने तब्बल 5 वर्षांनंतर या प्रकरणातील 10 आरोपींविरोधात औपचारिकपणे आरोप निश्चित केले आहेत. यामुळे आता या हायप्रोफाइल खटल्याच्या प्रत्यक्ष सुनावणीला थेट सुरुवात होणार आहे.

या कार स्फ़ोटक प्रकरणी माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांच्यासह सर्व 10 आरोपींवर बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा (UAPA), भारतीय दंड संहिता (IPC) आणि स्फोटक पदार्थ कायद्यातील विविध गंभीर कलमांनुसार खटला चालवला जाणार आहे

घटनेची सुरुवात (25 फेब्रुवारी 2021 ): ‘अँटिलिया’ निवासस्थानाजवळ जिलेटिनच्या 20 कांड्या आणि एक धमकीचे पत्र असलेली बेवारस स्कॉर्पिओ गाडी उभी असल्याचे आढळले होते. या घटनेने देशभरात प्रचंड खळबळ उडवून दिली होती.
संशयित हत्या (5 मार्च 2021 ): सदर गाडीशी संबंधित व्यावसायिक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीत संशयास्पद स्थितीत आढळून आला. हिरेन यांच्या कुटुंबाने सचिन वाझे आणि त्यांच्या साथीदारांवर हत्येचा थेट आरोप केला होता.
केंद्रीय यंत्रणेकडे तपास: प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्रीय गृह मंत्रालयाने हा तपास महाराष्ट्र एटीएसकडून (ATS) राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) वर्ग केला होता. न्यायालयाने सर्व आरोपींवर गुन्हेगारी कट रचणे, दहशत माजवणे आणि हत्येचे आरोप ठेवल्याने आता या बहुचर्चित प्रकरणाचा निकाल नेमका काय लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






