पुणे : सरकारी नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने तब्बल 117 उमेदवारांची 3 कोटी 73 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना बारामतीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रणजित हरीभाऊ मोढे (रा. सूर्यनगरी, बारामती) यांनी या संदर्भात पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून सुबायू सरकार उर्फ राणा (रा. वर्धमान, कोलकाता) आणि प्रमोद भगवान गुरव (रा. नवी मुंबई, मूळ रा. सातारा) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आरोपींनी उमेदवारांना विश्वास बसावा म्हणून शासकीय विभागांच्या बनावट निवड याद्या आणि बनावट शिक्के असलेली नियुक्तीपत्रे दिली होती. इतकेच नाही तर काही उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठवण्याचे नाटकही आरोपींनी केले. मात्र, प्रत्यक्षात एकाही उमेदवाराला नोकरी मिळाली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितांनी पोलिसांत धाव घेतली.
2020 सालापासून फिर्यादी आणि आरोपी प्रमोद गुरव यांची ओळख होती. गुरवने त्यांची भेट सुबायू सरकारसोबत घडवून आणली. आरोपींनी आरोग्य, वन, जलसंपदा, समाजकल्याण, रेल्वे आणि ONGC यांसारख्या विविध सरकारी विभागांमध्ये नोकरी लावून देण्याचा दावा केला होता. यापूर्वी अनेकांना नोकरीला लावल्याचे सांगत त्यांनी तरुणांचा विश्वास संपादन केला.
2023-24 मधील नोकरभरतीचा फायदा घेत आरोपींनी उमेदवारांकडून अर्ज भरून घेतले. राज्य सरकारच्या विविध संस्थांमध्ये नोकरीसाठी प्रत्येकी 5 लाख रुपये आणि रेल्वेतील नोकरीसाठी 6 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. त्यानुसार 117 तरुणांकडून रोख व ऑनलाइन स्वरूपात 3 कोटी 73 लाख रुपये उकळण्यात आले.
सध्या बारामती तालुका पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.







