Maharashtra Weather Update : मुंबई : आयएमडीच्या अंदाजानुसार, देशभरात काही ठिकाणी आज पावसाची शक्यता आहे. मुंबईकरांना थंडीसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागू शकते. मुंबईसह महाराष्ट्रात या आठवड्यात तापमानात जास्त बदल होण्याची शक्यता नाही. तामिळनाडू, केरळ, किनारी कर्नाटक, किनारी आंध्र प्रदेश, पूर्व आसाम, अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, लक्षद्वीपभागात काही ठिकाणी मुसळधार पावसासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. पण, महाराष्ट्रात मात्र आज कोरडं आणि ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे.
18 ते 20 डिसेंबर दरम्यान, वाऱ्याची दिशा थोडी बदलण्याची शक्यता आहे. पण, शक्यतो महाराष्ट्राच्या हवामानात जास्त बदल होणार नसून तापमान कायम राहण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात तीव्र थंडीची लाट पाहायला मिळत आहे. काही भागात तापमान शून्याच्या खाली घसरलं आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी होत असल्यामुळे नयनरम्य दृश्ये पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. पर्यटक सर्वत्र परसलेली बर्फाची चादर आणि गुलाबी थंडीचा आनंद घेताना दिसत आहे. काश्मीर खोऱ्यात सध्या हाडे गोठवणारी थंडी आहे.
केरळमध्ये पुढील दोन दिवसांत गडगडाटी वादळी वारे, विजांचा कडकडाट यांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, सिक्कीममध्ये आज गारपीट होण्याची शक्यता आहे, तर अरुणाचल प्रदेशमध्येही आज 13 डिसेंबर हिच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.