पालघर : महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी (TDF) चे राज्यस्तरीय अधिवेशन शनिवारी (दि. 26) पालघर येथे उत्साही वातावरणात राज्याचे अध्यक्ष शिक्षक नेते जी.के. थोरात यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीपणे संपन्न झाले.
सदर अधिवेशनाचे उद्घाटन राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. अधिवेशनाच्या प्रथम सत्रामध्ये सर्व शिक्षक बंधू भगिनींना मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शिक्षण क्षेत्रातल्या अनेक समस्यांवर आपले मत व्यक्त करत भविष्य काळामध्ये या सर्व समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीच्या वतीने त्यांना शिक्षण क्षेत्रातल्या विविध समस्यांचे निवेदन देण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने शिक्षक व शिक्षकेतर भरती, शिक्षकांची अशैक्षणिक कामे, पवित्र पोर्टल, निवड श्रेणी,पेसा अंतर्गत भरती या समस्यांचा समावेश होता.
महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याबरोबर टीडीएफच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र मीटिंग चे आयोजन करून त्या सोडवण्याबाबतचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. या अधिवेशनात महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीच्या अपरांत या स्मरणिकेचे प्रकाशन मा.मंत्री महोदयांच्या व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रसिद्ध वृत्त निवेदक प्रसन्न जोशी सरानी शिक्षक हा समाज परिवर्तन प्रक्रियेतील प्रमुख घटक असून त्याचे मोलाचे योगदान स्पष्ट केले . व यासाठी महामंडळ असण्याची स्तरावर आवश्यकता आहे असे मत व्यक्त केले.अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करताना येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीला शिक्षकांचे समस्या सोडवण्यासाठी सर्वपोतरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, पालघर चे खासदार डॉ. हेमंत सावरा यांनी आपली मनोगते व्यक्त करून अधिवेशनास शुभेच्छा दिल्या. पुण्यातील सहा शिक्षकांसह आपल्या पुणे विभागाचे अध्यक्ष प्राचार्य शिवाजीराव कामथे सरांचा तसेच राज्य कार्यकारिणीच्या सदस्यांचा माननीय उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी राज्यभरातून जवळपास 2000 शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष् नरसु पाटील सरांनी केले तर आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये राज्याचे अध्यक्ष जी.के. थोरात सर यांनी संघटनेची गरज व महत्त्व स्पष्ट करून येणाऱ्या काळामध्ये शिक्षकांच्या हक्कासाठी अविरतपणे संघर्ष करण्यासाठी तयार राहण्याचे आवाहन त्यांनी सर्व शिक्षक बंधू-भगिनींना केले. यावेळी त्यांनी सर्व जीवनगौरव पुरस्कार व राज्य गुणवंत शिक्षक/ शिक्षिका पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
हे अधिवेशन भव्य दिव्य,नेटके व दिमाखदार करून सर्वच बाबतीत यशस्वी करण्यात मोलाचा सहभाग असणाऱ्या पालघर येथील सर्व शिक्षण संस्था,सर्व संचालक मंडळ, प्राचार्य, सर्व शिक्षक व शिक्षकेतर स्टाफ,तसेच महाराष्ट्र टीडीएफचे सचिव ,सर्व राज्य कार्यकारणी सदस्य तसेच पालघर ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ सहकारी पतपेढीच्या सर्व संचालक मंडळाचे मोलाचे सहकार्य लाभले.