पुणे : औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशीव नामांतर केल्यानंतर पुणे शहराचे नामकरण करण्याची मागणी जोर धरत होती. मात्र पुणे पाठोपाठ आता पुण्यातील महंमदवाडी भागाचे नाव महादेववाडी करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. भरत गोगावले यांनी केलेल्या मागणीची माहिती प्रमोद भानगिरे यांनी त्यांच्या एक्स हॅण्डलवरून ट्विट करत दिली आहे. (MLA Bharatsheth Gogawale)
आता लवकरच महंमदवाडी या भागाचे नाव महादेववाडी होणार असून याबाबतची दाखल राज्याचे मुख्यमंत्री यांनी घेतली आहे. तसेच महापालिका आयुक्तांना याबाबतची माहिती तपासून कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हा प्रस्ताव लवकरच मान्य होईल. असा विश्वास प्रमोद भानगिरे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, यापूर्वीही महंमदवाडी भागाचे नाव महादेववाडी करण्यात यावे, अशी मागणी देखील करण्यात आली होती. मात्र आता भरत गोगावले यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ही मागणी पुन्हा केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(Pramod Nana Bhangire)
नेमकं काय म्हणाले प्रमोद भानगिरे
“महम्मदवाडीचे आता होणार महादेववाडी…!!! हडपसर विधानसभा मतदारसंघातील महंमदवाडी या भागाचे नामकरण महादेववाडी करावे अशी मागणी शिवसेना पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार भरतशेठ गोगावले यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लोकनेते एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे केल्यामुळे लवकरच आता महंमदवाडी या गावाचे नाव महादेववाडी होण्यास मदत होईल, जय महाराष्ट्र, जय श्रीराम”, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
महम्मदवाडीचे आता होणार महादेववाडी…!!!#हडपसर विधानसभा मतदारसंघातील महंमदवाडी या भागाचे नामकरण महादेववाडी करावे अशी मागणी शिवसेना पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार भरतशेठ गोगावले यांनी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री लोकनेते एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे केल्यामुळे लवकरच…
— Pramod Bhangire (Nana) (@bhangire_pramod) November 24, 2023