उरुळी कांचन, (पुणे) : पूर्व हवेलीतील पशुधनाला विषाणूजन्य लंपी स्कीन या आजाराचा धोका वाढू नये यासाठी लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचनसह परिसरातील जनावरांसाठी मोफत लस देण्यात येत आहे. तरी शेतकऱ्यांनी आपआपल्या जनावरांचे लसीकरण करून घ्यावे असे आवाहन लोणी काळभोर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. निता लाडूकर व उरुळी कांचन येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पृथ्वीराज गाडे यांनी केले आहे.
लम्पिच्या समस्येची तातडीने दखल घेत लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, उरुळी कांचन, शिंदवणे, कोरेगाव मूळसह परिसरात मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. अशी माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पूर्व हवेलीतील लोणी काळभोर व उरुळी कांचनसह परिसरात मागील १५ दिवसांपासून लसीकरण सुरु आहे.
लम्पी या रोगामुळे जनावरे बाधित होत असून हि गंभीर समस्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने चिंता वाढवणारी आहे. त्यामुळे पूर्व हवेलीतील शेतकऱ्यांनी जनावरांच्या गोठ्याच्या परिसरात स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. तसेच जनावरांना सकस आहार देऊन त्यांची रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. असे आवाहान वैद्यकीय अधिकाऱ्याकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, या आजाराचा प्रचार व प्रसार रोखण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी आपआपल्या जनावरांची काळजी घेणे गरजेचे आहे. “गोठा स्वच्छ ठेवणे, गोठ्यांमध्ये डास, माशा, पिसवा, गोचीड, यासारख्या हवेत उडणाऱ्या आणि प्रसार करणाऱ्या किड्यांना प्रतिबंध करणे हे सर्वात महत्वाचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी गोठ्याच्या परिसरामध्ये धूर करावा तसेच निर्जंतुकीकरणाची औषधे फवारीत असेही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.