लोणी काळभोर : दरोडा, घरफोडी, चोरी यासारख्या गंभीर गुन्ह्याचा तपास लावून लोणी काळभोर पोलिसांनी 17 गुन्ह्यातील तब्बल 45 लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. हा मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशाने नागरिकांना देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. तर अनेक नागरिकांनी पोलीस प्रशासनाच्या कामगिरीचे भरभरून कौतुक करून आभार मानले आहेत.
महाराष्ट्र पोलीस दलाचा 2 जानेवारी हा स्थापना दिवस आहे. या दिवसाचे औचित्य साधून सप्ताहामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन हा दिवस मोठ्या उत्साहाने “महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस” म्हणून साजरा करायचा आहे, असे आदेश पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेले आहेत. त्या अनुषंगाने परिमंडळ 5 कार्यक्षेत्रातील मुद्देमाल वितरण समारंभाचा कार्यक्रम वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवनात सोमवारी (ता. 6) सहा वाजता पार पडला.
यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्ह्यात जप्त केलेला मुद्देमाल फिर्यादी यांना परत केला. यावेळी पुणे शहर पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) प्रविण पाटील, अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) अरविंद चावरिया, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील, परिमंडळ 5 चे पोलीस उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे व पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, या समारंभामध्ये परिमंडळ 5 कार्यक्षेत्रातील एकूण 9 पोलीस ठाणे यांच्याकडे वेगवेगळया कलमांना अनुसरुन दाखल असलेल्या गुन्ह्यांमधील 80 फिर्यादींचा 1 कोटी 76 लाख 67 हजार 302 रुपये इतक्या किंमतीचा (त्यामध्ये दुचाकी, तिनचाकी व चारचाकी वाहने, मोबाईल फोन, सोन्या चांदीचे दागिणे व रोख रक्कम) मुद्देमाल जमा आहे. हा मुद्देमाल न्यायालयाने आदेशित केलेला व भारतीय नागरिक सुरक्षा संहिता सन 2023 चे कलम 106 मधील तरतुदीनुसार देय असलेला किंमती मुद्देमाल संबंधित फिर्यादी यांना परत करण्यात आला आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी मोठ्या शिताफीने कारवाई करून 17 गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये 7 गुन्ह्यांमधील चालू बाजारभावाप्रमाणे 19 लाख 21 हजार रुपये किंमतीचे सोने, तर 10 गुन्ह्यातील 26 लाख 40 हजार रुपये किंमतीची 10 वाहने यामध्ये पिकअप, रिक्षा, बल्कर व दुचाकी यांचा समावेश असून सुमारे 45 लाख 61 हजार रुपयांचा मुद्देमाल नागरिकांना परत केला आहे. यावेळी नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होते. नागरिकांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले. यावेळी आपणही पोलीस दलाच्या माध्यमातून चोख कर्तव्य बजावीत असून नागरिकांची सेवा करीत आहोत. असे पोलीस बांधवांच्या चेहऱ्यावरील समाधानामुळे स्पष्ट दिसून येत होते.
यावेळी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट, पोलीस उपनिरीक्षक योगेश पैठणे, पोलीस हवालदार निशा कोंढे, महेश चव्हाण, संदीप जोगदंड, प्रशांत कळसकर, गोपनीय विभागाचे प्रमुख पोलीस हवालदार रामदास मेमाणे, रवी आहेर व पोलीस अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुद्देमाल परत दिलेल्या नागरिकांची नावे पुढीलप्रमाणे
1) सोन्या चांदीचे दागिने : रत्ना शिवाजी हरणे, रवींद्र दत्तात्रय जाधव, रुपाली विलास सातव, विशाखा सचिन काळभोर, विकास भाऊ शेंडगे, शुभांगी प्रमोद गरड, बाबासाहेब वामन गायकवाड
2) वाहने : सुभाष नामदेव सातपुते, आसिफ सय्यद मुलाणी, दिपाली संदिप मते, बापु शिवाजी जानकर, लक्ष्मी चेतन पोटोळे, जयश्री रमेश जगताप, अशोक दत्तात्रय मुटकुळे, सारिका ज्ञानेश्वर धुमाळ, अंबादास वैजनाथ झाटे, परमेश्वर वैजनाथ कदम