लोणी काळभोर : देशी विदेशी मद्याची अनधिकृत वाहतूक करणारी संशयित कार लोणी काळभोर पोलिसांनी थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील स्मशानभूमी जवळ सोमवारी (ता.30 डिसेंबर) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पकडली आहे. मात्र या कारमधून झालेली दारूची वाहतूक बेकायदाच असल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे.
दरम्यान, पोलिसांनी या कारवाईत गाडीसह 6 लाखांचा मद्यसाठा जप्त करून एकावर गुन्हा दाखल केला आहे. लोणी काळभोर पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे. तसेच पुणे शहर पोलीस दलातील बड्या अधिकाऱ्यांकडून लोणी काळभोर पोलिसांच्या पाठीवर शाबासकीची थाप मिळत आहे.
अमित राजाराम गोरे (वय-38, रा. मोरेवस्ती, मांजरी फार्म, ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर याप्रकरणी पोलीस अंमलदार घनशाम कुमार आडके (वय-35) यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थेऊर कोलवडी रस्त्यावरून बेकायदा देशी विदेशी मद्याची वाहतूक कार मधून केली जाणार आहे. अशी माहिती लोणी काळभोर पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी थेऊर स्मशानभूमी परिसरात सापळा रचला. व मद्याची अनधिकृत वाहतूक करणारी कार आल्यानंतर मोठ्या शिताफीने पकडली.
मद्यानी भरलेली कार सोडावी म्हणून अनेक राजकीय नेत्यांसह प्रतिष्ठित नागरिकांचे पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता निडरपणे कारवाई केली आहे. आणि या कारवाईत पोलिसांनी 95 हजार रुपये किंमतीच्या बिअरसह देशी विदेशी दारूच्या बाटल्या. व ५ लाख रुपये किंमतीची टोयोटा कंपनीची कार असा सुमारे 5 लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके करीत आहेत.