लोणी काळभोर : किरकोळ वादातून 8 ते 10 जणांच्या टोळक्याने 3 जणांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील अक्षय ग्राफीक्स दुकानाच्या समोर सोमवारी (ता.7) दुपारी अडीज वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याप्रकरणी अक्षय तानाजी ताकपेरे (वय- 26 रा. तथागत बंगलो, यशवंत कॉलनी, घोरपडे वस्ती, कदमवाकवस्ती, ता. हवेली, पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रमोद काळभोर (रा. लोणी काळभोर ता हवेली जि पुणे) व आठ ते दहा अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय ताकपेरे यांचा फ्लेक्स प्रिंटींगचा व्यवसाय आहे. फिर्यादी अक्षय व आरोपी प्रमोद काळभोर यांचा हडपसर जवळील 15 नंबर या ठिकाणी किरकोळ कारणावरून काही दिवसापूर्वी वाद झाला होता. या वादाचा राग प्रमोदच्या मनात होता.
दरम्यान, अक्षय व त्याचे मित्र अनिकेल लांडगे, विपुल गायकवाड असे तीघेजण सोमवारी कारमधून चालले होते. तेव्हा प्रमोद व त्याचे 8 ते दहा मित्र थार व दुचाकीवरून आले. आरोपींनी जुन्या वादाचा राग मनात धरून लोखंडी रॉड, काठी व बेल्टने अक्षयला मारहाण केली. तर भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या दोघांनाही आरोपींनी लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण केली. तसेच आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
यानंतर अक्षयने तत्काळ लोणी काळभोर पोलीस ठाणे गाठले. व आरोपींच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार आरोपींवर भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 118(1), 115 (2), 351(2), 189(1)(2), 191(2), 190 प्रमाणे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1) (3) सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के करीत आहेत.