केडगाव : एकेकाळी बिबट्या (Leopard) हा प्राणी वनात, जंगलात तसेच अरण्यात पाहायला मिळायचा पण आता परिस्थिती बदलली असून जस जशी माणसांनी प्रगतीच्या नावाखाली जंगलात शिरकाव केला तसाच बिबट्यांनी ही मनुष्य वस्ती कडे मोर्चा वळवला असल्याचे पाहायला मिळत आहे.
दौंड तालुक्यातील एकेरीवाडी व देलवडी या गावामध्ये बिबट्याची फार मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली आहे. गावासह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेली महिनाभर बिबट्या रोज कोणाला ना कोणाला दिसत आहे. अनेक दिवसापासून प्रत्येक रात्री बिबट्या गावालगत येऊन हैदोस घालत आहे.
गावातील भटक्या तसेच पाळीव कुत्र्यांची संख्या झपाट्याने कमी झाली असून शेतलागत राहणाऱ्या लोकांना रात्रीत जागरण करण्याची वेळ आली आहे. भीतीपोटी ते झोपसुद्धा नाहीत. एखाद्या दिवशी माणसावर हल्ला करून त्यात माणसाचा जीवसुद्धा जाऊ शकतो, असे ग्रामस्थांनी सांगितले. वन विभागाला याबाबत वेळोवेळी माहिती दिली असून, वन विभाग याबाबत ठोस उपाययोजना करीत नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पिकांना पाण्याची जास्त प्रमाणात आवश्यकता असते त्यात विजेचा मोठा प्रश्न आहे. कारण एक आठवडा वीजपुरवठा दिवसा मिळतो तर दुसरा आठवडा रात्रीची मिळतो .त्यामुळे ग्रामस्थांना जीव अक्षरशः मुठीत घेऊन जीवन जगावे लागत आहे.
या बाबत वन विभागाला कळवले असून गेली एक महिन्यापासून या विभागाला एक पिंजरा उपलब्ध करता आला नाहीये यामुळे सध्या ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
यावेळी ग्रामस्थ संजय वाघोले म्हणाले की, ग्रामस्थांना विनंती आहे, की पहाटे चार ते सात च्या व रात्री आठ ते आकरा च्या दरम्यान एकट्याने बाहेर पडू नये, तसेच बिबट्या दिसल्यास त्याला इजा करण्याचा किंवा डिवचण्याचा प्रयत्न करू नये. आता वीज ही रात्री ची असल्यावर पिकांना पाणी देण्यासाठी जावेच लागते. नाही गेलो तर पिके जाळून जातील. गेली कित्तेक दिवसापासून पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. पिंजरा सुधा प्रशासनाने लावला नाही. रात्रीचे जावे तर बिबट्याची भीती नाही जावं तर पीक जळण्याची भीती आम्ही काय करावे.