पुणे : श्रीलंकेत जानेवारीच्या अखेरीस आर्थिक संकटाला सुरुवात झाली आणि त्यामुळे पासपोर्ट कार्यालयात पासपोर्टसाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. बहुतेक लोकांनी एक दिवसीय पासपोर्ट सेवेचा पर्याय निवडला आहे. अशा परिस्थितीत एका महिलेची प्रसूती चक्क पासपोर्टच्या रांगेत उभी असतानाच झाली.
श्रीलंकेतील अराजकामुळे तो देश सोडणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट हवा असल्याने येथील नागरिकांना भल्या मोठ्या रांगेत उभे राहावे लागत आहे. या रांगेत एका दिवस भरत आलेल्या गर्भवती महिलेला सलग दोन दिवस उभे राहावे लागले. रांगेत उभी असतानाच तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तिथे तिने एका मुलीला जन्म दिला.
कोलंबोमधील इमिग्रेशन विभागात तैनात असलेल्या श्रीलंकन लष्कराच्या कर्मचार्यांनी २६ वर्षीय महिलेला प्रसूतीवेदना होत असताना कॅसल हॉस्पिटलमध्ये नेले, तिथे तिची प्रसूती झाली. श्रीलंकेतील सेंट्रल हिल्स येथील ही महिला तिच्या पतीसह परदेशात काम करण्यासाठी जाणार होती. त्यासाठी तिला पासपोर्टची गरज होती. ती नऊ महिन्यांची गर्भवती असूनही तिला पासपोर्टच्या रांगेत विशेष सवलत मिळाली नाही, सलग दोन दिवस उभे राहावे लागले.