मुकुंद रामदासी
बेंबळे, (सोलापूर) : सोलापूर जिल्ह्यात पाऊस असो वा नसो, उजनी जलाशयातील पाणी पातळीचा संबंध हा पुणे जिल्हा, मावळ भाग, भीमाशंकरचे डोंगर व लोणावळ्याचा पश्चिम भागातील पावसावर व त्या भागातील मुळा, मुठा, पावना, कर्हा, इंद्रायणी या नद्यांतून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहावर अवलंबून आहे. कारण या सर्व नद्या काही ठराविक अंतराने पुढे भीमा नदीला येऊन मिळतात .
उजनीच्या पुणे जिल्ह्यातील नद्यावर १९ धरणातील पाणी पातळी वाढल्यानंतर त्यातून पुढे येणाऱ्या पाण्यावर उजनीची पातळी अवलंबून असते. सध्याच्या पावसाळ्यात एक जुलैपासून पुणे जिल्हा व परिसरात मोठ्या प्रमाणावर दमदार व सतंतधार पाऊस झालेला असल्यामुळे उजनी वरील १९ धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. उजनी धरणातील जलाशयामधे २० ते २२ जुलै रोजी दुपारी ५० टक्के पाणीपातळी ओलांडली आहे. मागील वर्षी २०२१ च्या पावसाळ्यात ३१ जुलै २१ रोजी रात्री नऊ वाजता उजनी धरणात ५० टक्के पाणीसाठा झाला होता.
बुधवारी (ता. २०) दुपारी ५३.६६ टक्के पाणीसाठा झालेला आहे. म्हणजे मागील वर्षीपेक्षा पेक्षा १३ दिवस अगोदर हा पाणीसाठा झालेला दिसुन येत आहे. सध्या धरणात ९२ टीएमसी पाणी साठा झालेला असून पाणी पातळी ४९४.९७० मीटर पर्यंत पोहोचली आहे. सध्या पुणे विभागात पावसाचा वेग मंदावला असल्यामुळे भीमा नदीच्या दौंड येथून येणाऱ्या विसर्गा मध्ये सतत चढ-उतार दिसून येत आहे. २० जुलै रोजी दुपारी दौंड विसर्ग २७ हजार १७२ क्युसेक्स असून बंडगार्डन (पुणे ) विसर्ग ८४३६ क्युसेक्स आहे.
आकडे टक्केवारीत :-
सध्या पिंपळजोगे ५१, माणिक डोह ४९, येडगाव ९४, वडज ७८, डिंभे ६३, घोड ७७, विसापूर ३४, कळमोडी १००, चासकमान ९७, भामा आसखेडा ८४ टक्के, वडिवळे ८२ टक्के, आंध्रा १००, पवना ६९, कासारसाई ८७,, मुळशी ६६, टेमघर ५२, वरसगाव ६१, पानशेत ७१, व खडकवासला १०० टक्के असा पाणीसाठा झालेला आहे.
दरम्यान, यातील तीन धरणे १०० टक्के भरली आहेत. तीन धरणातील पाणी पातळी ८५ टक्केच्या पुढे आहे, ९ धरणामध्ये ७५ टक्के पेक्षा जास्त पाणी आहे व उर्वरित ४ धरणामध्ये ५०टक्के पेक्षा जास्त पाणीसाठा आहे. त्यामुळे सध्या ज्या धरणातील पाणीसाठा मर्यादित पातळीपेक्षा जास्त होतो त्या धरणातून पाण्याचा विसर्ग खाली सोडला जातो व त्यामुळे भीमा नदीत येणाऱ्या दौंड विसर्गा मध्ये सतत चढ-उतार दिसून येत आहे. तरीपण संथ गतीने का असेना उजनीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे ही सोलापूरकरांसह परिसरातील नागरिकांसाठी समाधानकारक बाब आहे.