पुणे : पुण्यात गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. अशातच आता दारुला पैसे देत नाही, आणि स्वत: मात्र, दारु पित बसतो. सतत त्रास देतो, धमकी देतो या कारणावरुन डोक्यात सिमेंटचा गट्टू मारुन एकाचा खुन केल्याची धाकादायक घटना घडली आहे. ही घटना १५ डिसेबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास लोणी काळभोर येथील दत्तात्रय सखाराम कांबळे याच्या खोलीत घडली होती.
योगेश लक्ष्मण काळभोर (वय-४५) असे खुन करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी २० दिवसानंतर आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. नटु ऊर्फ पोपट लक्ष्मण म्हात्रे (वय-३९, रा. मातंग वस्ती, लोणी काळभोर) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पोलिस तपासात पोलिसांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सोमनाथ किसन जाधव, दत्तात्रय सखाराम कांबळे यांची पत्नी संगीता दत्तात्रय कांबळे यांच्याकडे चौकशी केली. सोमनाथ जाधव व योगेश काळभोर हे एका खोलीत दारु पित बसले होते. त्यावेळी आरोपी पोपट म्हात्रे हा त्यांच्या खोलीत आला.
दरम्यान, आरोपी योगेश काळभोरला म्हणाला, तू मला दारु पिण्यासाठी पैसे देत नाहीस, मला सारखा त्रास देतोस, धमकी देतोस, असे म्हणून योगेश काळभोर याच्या डोक्यात सिमेंटच्या गट्टुने जोराने मारहाण केली. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार करीत आहेत.