केडगाव / संदीप टूले : धरण कालव्यातून सुटणाऱ्या बीबीसी कॅनॉलची (भिगवन ब्रांच) सध्या दुरुस्ती करणे फार गरजेचे आहे. या कॅनॉलमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा, काटेरी झुडपे, तसेच गवत मोठ्या प्रमाणात उगवली आहेत. त्यामुळे तातडीने दुरुस्ती झाल्यास दौंड पूर्व भागातील अनेक गावच्या पिण्याच्या व शेतीसाठीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
मळद व येडेवाडीच्या शिवारातून खडकवासला धरण कालव्यातून दौंड पूर्व भागातील येडेवाडी, खोरवडी, आलेगाव, बोरीबेल, देऊळगाव राजे, हिंगणीबेर्डी, शिंगाडेवाडी, गाडेवाडी, लोणारवाडी, काळेवाडी, मलठण, राजेगाव या गावासाठी हा कॅनॉल वरदान ठरलेला असून, यावर एक ते बारा असे उपफाटे आहेत. याद्वारे या भागातील सर्व ठिकाणे पाण्याचे नियोजन केले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या चारीत वाढता दगडी बांधकामाची पडझड, काटेरी झाडे झुडपे उगवलेली आहेत.
चारी नादुरुस्त झाल्याने या गावांना पाणीपुरवठा करताना जलसंपदा विभागाला मोठी दमछाक करावी लागत आहे. त्यामुळे ‘हेड टू टेल’ असे पाण्याचे आवर्तन काढताना अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी येत असतात. जवळपास 30 किलोमीटर अंतराच्या या चारींवर बारा गावातील शेतीच्या व पाण्याचा प्रश्न मार्गी लागतो. या चाऱ्यांमधूनच अनेक गावातील तलाव उन्हाळ्यामध्ये भरण्यात येतात. महत्त्वाच्या आवर्तनात या परिसरातून ऊस, कांदा, मका, गहू, बाजरी जनावरांची चारा पिके यासह कलिंगड, खरबूज, ढोबळीमिरची, टोमॅटो यासारखी पिके या परिसरातील शेतकरी घेत असतो.
मागील काही वर्षांपासून मुख्य चारी व उपचारीमध्ये मोठ्या प्रमाणावर घाण साचल्याने या परिसरात कमी दिवसात पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होत नाही. परिणामी, मलठण व राजेगाव परिसरातील शेतीला पाणीही पोहोचत नाही. या महत्वाच्या कॅनोलची तातडीने दुरुस्ती झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे अर्थकारण वेग घेताना दिसून येईल.
दौंड पूर्व भागासाठी वरदान ठरलेल्या बीबीसी चारीच्या दुरुस्ती गरजेची बनली असून, यामुळे पूर्व भागातील अर्थकारण सक्षम होईल. आमदार राहुल कुल यांच्या माध्यमातून लवकरच अस्तरीकरणाचं काम मार्गी लागणार आहे.
– गणेश गायकवाड, माजी ग्रामपंचायत सदस्य, हिंगणीबेर्डी, काळेवाडी