संदीप टूले
केडगाव : दौंड तालुक्यातील बोरीपार्धी येथील परमेश्वर इंगळे (वय ५०) आणि त्यांची पत्नी वंदना परमेश्वर इंगळे (वय ४६) पूर्णत: अंध असलेले दाम्पत्य आपल्या उदरनिर्वाहासाठी रेल्वे स्टेशनला येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांचे वजन करतात. यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या पैशात त्यांचा उदरनिर्वाह चालू आहे.
या अंध दाम्पत्याला २ मुली भाग्यश्री सातवीमध्ये शिकत आहे तर तेजश्री ही चौथीमध्ये शिकत आहेत. पूर्वी परमेश्वर इंगळे हे रेल्वेमध्ये खेळणी छोटे मोठे साहित्य विकण्याचे काम करत होते. पण वयोमानानुसार आता त्यांना ते काम होत नाही म्हणून ते रेल्वे स्टेशनवर एकाजागी वजनकाटा घेऊन प्रवाशांनी वजन करून जे पैसे येतील, त्यावर यांचा उदरनिर्वाह चालवत आहे. त्यात त्यांच्या पत्नीला ब्लडप्रेशर आणि शुगरचा त्रास आहे. याचाच मासिक वैद्यकीय खर्च ८०० रुपयांपर्यंत आहे.
इंगळे यांना शासनाकडून अवघे दोन हजार रुपये मानधन मिळत आहे. यात मुलींच्या शिक्षणाचा खर्च, पत्नीच्या औषधांचा खर्च, घर खर्च, घरची परिस्थिती अत्यंत बेताची या अंध दाम्पत्याच्या दिनक्रमाची माहिती ‘एक हात मदतीचा’ फाऊंडेशनच्या सदस्यांना मिळाली. यातील धनराज मासाळ यांनी सोशल मीडियाचा वापर करून केडगावकरांना या अंध दाम्पत्याच्या मदत कार्यासाठी आवाहन केले.
केडगावकरांनीही या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन या कुटुंबाला दैनंदिन जीवनात लागणाऱ्या कौटुंबिक वस्तुंसाठी आर्थिक स्वरूपात मदत केली. तर काही दानशूर व्यक्तींनी १५ ऑगस्ट या दिवशी या दोन्ही मुलींना एक शाळेचा युनिफॉर्म, दोन शाळेचे बूट सॉक्स ,बेल्ट असे शालेय जीवनात उपयोगी पडेल असे साहित्य दिले तर काहींनी यापुढील लागणाऱ्या औषधांचा खर्च देऊ केला.
दरम्यान, या तरुणांच्या कार्यातून त्यांनी जनतेला एक चांगला संदेश दिला आहे. कुठेतरी माणुसकीही जिवंत आहे. या तरुणांनी त्यांच्या कार्यातून खरे माणुसकीचे दर्शन घडवले आहे.
आम्हाला अगोदर या मुलींची माहिती मिळाली की, त्या अंध दाम्पत्याच्या मुली आहेत. आम्ही त्यांची खात्री करण्यासाठी त्यांच्या घरी गेलो तेव्हा आम्हाला त्यांच्या घरची परिस्थिती किती हलाखीची असून या अंध दाम्पत्याना खरी मदतीची गरज आहे. तेव्हा आम्ही त्यांना एक हात मदतीचा फाऊंडेशनतर्फे मदत करण्याचा निर्णय घेतला.
– धनराज मासाळ, सदस्य, एक हात मदतीचा फाउंडेशन