बारामती, (पुणे) : बारामतीतील एका युवक-युवतीने प्रामाणिकपणा आणि सामाजिक जबाबदारीचे दर्शन घडवत बसमध्ये सापडलेले दागिने व रोख रक्कम बारामती शहर पोलीसांच्या स्वाधीन करून सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरी अनिल दाने (वय-26) आणि गौरव आसलकर हे दोघे अहिल्यानगर आगाराच्या एमएच 14 बीटी 3491 क्रमांकाच्या बसमधून प्रवास करत होते. फलटण बसस्थानक सोडल्यानंतर काही वेळाने त्यांना जाग आली असता त्यांच्या सीटच्या मधोमध एक छोटे पाकीट पडलेले दिसले.

कुतूहलापोटी त्यांनी पाकीट उघडून पाहिले असता त्यामध्ये 6 हजार रुपये रोख रक्कम आणि सोन्याचे असलेले दोन झुमके आढळून आले. मौल्यवान वस्तू सापडूनही त्या दोघांनीही तात्काळ बारामती शहर पोलीस ठाणे गाठून संपूर्ण मुद्देमाल पोलीसांच्या ताब्यात दिला. संबंधित वस्तूंचा खरा मालक शोधून त्याला त्या परत मिळाव्यात, या हेतूने त्यांनी ही कृती केल्याचे सांगितले.
या घटनेचे बारामती शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी विशेष कौतुक केले. त्यांनी गौरी दाने आणि गौरव आसलकर यांचे अभिनंदन करत नागरिकांनी सापडलेली मालमत्ता योग्य त्या व्यक्तींपर्यंत पोहोचविण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
दरम्यान, आजच्या स्वार्थी मानल्या जाणाऱ्या युगातही प्रामाणिकपणा, नैतिकता आणि सामाजिक बांधिलकी जपणारे नागरिक समाजात आहेत, याचा प्रत्यय या घटनेतून आला आहे. गौरी दाने आणि गौरव आसलकर यांनी दाखविलेली ही कृती केवळ हरवलेला मुद्देमाल परत करण्यापुरती मर्यादित नसून समाजातील विश्वास, नैतिक मूल्ये आणि माणुसकी जपणारा प्रेरणादायी आदर्श ठरली आहे.







