अजित जगताप
सातारा : डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या शिकवणीचा वापर आपल्या जीवनात करून चळवळीसाठी झटणाऱ्या भीमाची वाघीण बनुबाई येलवे आजींना अखेरचा रिपाइं पक्षाचा जय भिम करण्यात आला. खटाव तालुक्याच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष कृणाल गडांकुश यांनी बनुताई येवले यांच्या कार्याला आठवणीतून उजाळा दिला.
महाराष्ट्रात पंधरा वर्षांपूर्वी माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनी मागासवर्गीय आरक्षणाच्या कुबड्या किती दिवस हव्यात?असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी त्यांना रोखठोक पद्धतीने जाब विचारण्यासाठी बनुताई येवले निळा झेंडा घेऊन कराडच्या टॉवन हॉल मध्ये शिरल्या होत्या. ते वाघिणीचे रूप व डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे हे वाक्य सुनावले होते.
आज शालिनीताई पाटील यांच्याच मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी रिपाइं व स्वतः बनुताई येवले यांनी करून समतेचा खरा नारा दिला होता.आज वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर जागा व्यापून टाकणारे नेते कुठेच दिसत नाही पण, बनुताई येवले यांच्या जाण्याने पुरोगामी विचारांचा कार्यकर्ता हळहळ व्यक्त करीत आहेत.
रिपाइं सर्वच नेत्यांचा आदर करणाऱ्या बनुताई येवले यांनी अखेरपर्यंत निळ्या झेंड्याला कवटाळले होते. आदरणीय नेते रामदास आठवले साहेब यांच्या भेटीने त्यांना अधिकच चैतन्य निर्माण होत असे. त्यांच्या आजारपणात त्यांना मदत करण्यासाठी अनेक जण सरसावले. पण, काहींनी मदत करण्यासाठी थोडे पुढे आले असते तर बरे झाले असते. अशी भावना गोरगरीब रिपाइं कार्यकर्ते बोलून दाखवित आहेत.
हातात निळा झेंडा घेतलेल्या बनुबाईंनी अनेक अन्याय-अत्याचारग्रस्त लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी ऊन, वारा, पाऊस याची तमा न करता काम केले होते.अनेक विधवांना शासकीय पेन्शन मिळवून दिली,नवरा नांदवत नसलेल्या स्त्रियांचा संसार पुन्हा उभा करून दिला,शासकीय स्वस्त धान्याचा प्रश्न असो किंवा विद्यार्थ्यांच्या अनेक दाखल्याचा प्रश्न असो, त्यांनी तो लोकशाही पद्धतीने आंदोलन करून सोडवला. कोणत्याही प्रकारच्या मोबदला न घेता काम करणाऱ्या बनुताई येवले आजी आता पुन्हा या पिढीला दिसणार नाही.
घरची परिस्थिती बदलली पाहिजे याचा कधी ही त्यांनी विचार केला नाही. तसेच रिपाइं एका गटातून दुसऱ्या गटात जाण्याचा विचार केला नाही. प्रसिद्धी मिळाली पाहिजे असा त्यांचा कधीही आग्रह नव्हता पण, आंदोलनातून त्यांनी आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला होता. आज काही भुरट्या कार्यकर्त्यानी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन नव्हे घोषणाबाजी केली तरी त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे अशा वेळी रिपाइं वाघीण बनुताई येवले यांच्या आक्रमक भूमिका व प्रामाणिकपणे केलेल्या आंदोलनाची दखल घेणाऱ्या प्रसार माध्यमांचे नवल वाटत आहे. अशी ही प्रतिक्रिया उमटू लागली आहे.
प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याचे धाडस करणाऱ्या बनुताई येवले यांचा आदर्श आज कराड तालुक्यातील खेड्यापाड्यात घेतला जात आहे. ही त्यांच्या कार्याची दखल मानली जात आहे.
त्यांची मुलगी कमल सावंत यांनी सांगते की,”आई अडाणी होती,पण एक दिवस वाघ होऊन जगा हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वाक्य तिने ऐकलेले होते.ती आयुष्यभर स्वाभिमानाने जगली.कुणापुढे झुकली नाही.वाळू तस्कर आईला देण्यासाठी मोठ्या रकमा घेऊन यायचे पण,तो पैसा तिने कधीच स्वीकारला नाही.ती गरिबीत जगली,पण वाघासारखी स्वाभिमानाने जगली”.