श्रीहरीकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या वतीने आज ओशन सॅट सीरिजच्या तिसऱ्या जनरेशनमधील ‘ओशनसॅट-3’ या उपग्रहांसह ८ नॅनो उपग्रहांचे प्रक्षेपण श्रीहरीकोटा येथून करण्यात येणार आहे. हे प्रक्षेपण आज (ता. २६) सकाळी ११ वाजून ४६ मिनिटांनी होणार आहे.
इस्रोने नुकतेच खाजगी क्षेत्रातील मोहिमेत इतिहास रचला. पुढील PSLV-C54/ EOS-06 या मोहिमेसाठी इस्रो सज्ज असून यातील उपग्रहांचे प्रक्षेपण आज करण्यात येणार आहे. ‘ओशनसॅट’ म्हणजे पाहणी करणारा उपग्रह या प्रकारातील असून समुद्र विज्ञान आणि वातावरणाच्या अभ्यासासाठी हे उपग्रह महत्वाचे असणार आहे.
या प्रकारातील उपग्रह हे समुद्रातील वातावरणाचा अभ्यास करण्यासठी देखील सक्षम असून यामुळे समुद्रातून उठणाऱ्या संभाव्य चक्रीवादळाची माहिती देखील या उपग्रहाच्या माध्यमातून मिळणार आहे. संभाव्य चक्रीवादळाची माहिती आधीच मिळाल्यास होणारे मोठे नुकसान टाळण्यासाठीच्या उपाययोजना करता येणे शक्य आहे.
आज ‘ओशनसॅट’ ३ चे प्रक्षेपण करण्यात येणार असून ‘ओशनसॅट’ १ हा उपग्रह २६ मे १९९६ साली, ‘ओशनसॅट’ २ हा उपग्रह २३ सप्टेंबर २००९ साली प्रक्षेपित करण्यात आला होता. आज प्रक्षेपित करण्यात येणाऱ्या उपग्रहात ओशन कलर मॉनिटर OCM3, सी सर्फेस टेम्परेचर मॉनिटर (SSTM), ku-band स्केट्रोमीटर (SCAT-3) आणि ARGOS सारखे पॅलोड आहेत.
‘ओशनसॅट’ ३ च्या बरोबरीने आठ नॅनो उपग्रह देखील प्रक्षेपित करण्यात येणार आहेत. यात उपग्रहामधील पिक्सेलमधून आनंद, इस्रो भूटानसॅट, ध्रुव अंतरिक्षमधून दोन थायबोल्ट आणि स्पेसफ्लाइट यूएसमधून चार एस्ट्रोकास्टचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. ही संपूर्ण मोहीम जवळपास 8200 सेकंदांची (सुमारे २ तास २० मिनिट)आहे. ही पीएसएलव्हीची मोठी मोहीम असणार आहे. या दरम्यान, प्राथमिक उपग्रह आणि नॅनो उपग्रह दोन वेगवेगळ्या सोलर सनक्रोनस पोलर ऑर्बिटमध्ये (एसएसपीओ) प्रक्षेपित केले जाणार आहेत.