Inspring Story बीड : भल्या पहाटे उठायच. पोटाची खळगी भरण्यासाठी करपलेली भाकरी, कांदा अन मिरची यांनाच मिष्टांन्न म्हणून खायच. दिवसभर कंबर मोडेपर्यंत काम आणि रात्री उद्याचा दिवस कसा सरणार याची चिंता. ऊसाला गोडसाखरेच रूप देताना आयुश्य कटूतेने भरून जात. (Inspring Story) पण बीड जिल्ह्यातील सेलू तांडा ( ता. परळी ) गावातील ऊस तोडणी कामगार मारूती जाधव यांच्या तीन मुलींनी परीश्रम, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर पोलिस दलात पोलिस कॅान्स्टेबल पदापर्यंत मजल मारली आहे. त्यांच्या या कर्तुत्वाने आई वडीलांबरोबर ग्रामस्थांची मान उंचावली आहे. या तिन्ही बहिणींचे सर्वत्र विशेष कौतूक केले जात आहे. (Inspring Story)
महाराष्ट्र राज्यात नुकतीच पोलीस भरतीची प्रक्रिया पार पडली असून निकाल लागून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पोलिस प्रशिक्षणासाठी गेले आहे. या वेळी मोठ्या संख्येने मुली पोलीस दलात रुजू झाल्या. या भरती प्रक्रियेतून सेलू तांडा ( ता. परळी ) येथील ऊसतोड कामगार म्हणून काम करणाऱ्या मारुती जाधव यांच्या तीन मुली पोलीस कॉन्स्टेबल म्हणून भरती झाल्या आहेत. अथक मेहनत, परिश्रम, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर त्या पोलिस दलात भरती झाल्या आहेत. कुटूंबाची साथ असेल तर मुलगी देखील यशाचे शिखर गाठू शकते. हेच या तीन सख्ख्या बहिणींनी पोलिस दलात पोलिस कॅान्स्टेबल पदापर्यंत पोहचून दाखवून दिले आहे.
परळी तालुक्यातील सेलू तांडा मारुती जाधव सुरुवातीला ऊसतोड कामगार म्हणून काम करत होते. घरची गरबीची परिस्थीती त्यातून प्रपंचासाठी दरवर्षी नवीन साखर कारखान्यावर ऊसतोडणी करावयाचे. गावात जमीन नसल्याने ऊस तोडणी गळीत हंगाम संपल्यावर तेथेच कुठेतरी काम पहायचे. केवळ पावसाळ्यात घराकडे फिरकायचे असा त्यांचा नेहमीचा ऊस तोडणी कामगारांसोबतचा अनुभव होता.
पत्नी, पाच मुली आणि दोन मुलगे असा मोठा परिवार असल्याने भाकरीचा चंद्र शोधण्याशिवाय पर्याय नव्हता. कष्ट करताना जीवनात त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. त्यातून मुलींच्या शिक्षणाला त्यांनी साखर शाळेपासून सुरवात केली होती. मुलींना शिकवायचे मोठे अधिकारी बनवायचे असा त्यांचा ध्यास होता. ऊसतोडणी कामगारांच्या समस्यांना कंटाळून त्यांनी अखेर ऊसतोड मुकादम म्हणून काम करण्यास सुरूवात केली.
दरम्यान, जाधव यांची मोठी मुलगी सोनाली हीची कोरोनाच्या काळात पोलीस भरतीमध्ये निवड झाली झाली. तर दुसऱ्या दोन मुली शक्ती आणि लक्ष्मी या नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीमध्ये यशस्वी झाल्या आहेत. तिन्ही बहिणी गेल्या चार वर्षांपासून पोलीस भरतीसाठी कसून सराव करीत होत्या. एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या बहिणी पोलीस दलात सेवेत दाखल होणे ही बीडमधील पहिलीच घटना असावी.