माळशिरस: आकाशसोबतचे प्रेमसंबंध ‘त्या’ महिलेस नको होते, मात्र तो प्रेमसंबंध तोडण्याला तयार नव्हता. ‘माझ्यासोबतचे प्रेमसंबंध तोडल्यास तुझ्यासोबतचे नग्नावस्थेमधील व्हिडीओ व्हायरल करुन तुझी बदनामी करीन’ अशी तिला तो धमकी देऊन शारिरीक संबंध ठेवत होता. त्याच्या धमक्यांना आणि बळजबरीच्या शारिरीक संबंध ठेवण्याला ती वैतागली होती, त्या महिलेस आकाशच्या गुंत्यातून कायमचे निघायचे होते. शिवाय आपल्या आईला आकाश धमकावतोय, तो तिच्याशी लगट करतोय हे मुलास पटत नव्हते. तसेच आपल्या आयुष्याच्या जोडीदारीनीसोबत कोणी असणे, नातेवाईकांत, गावांत तसेच समाजामध्ये त्यातून इज्जत जाणे हे नवऱ्यासाठी तळपायाची आग मस्तकाला जाण्यासारखे होते, त्यामुळे मुलगा आणि नवरा हे दोघेही आकाशवर टपूनच होते. याच टप्यावर तिघे एकत्र आले आणि आकाशला आयुष्याची अद्दल घडविण्याचा डाव आखल्याची माहिती आकाश खुर्द-पाटील खून प्रकरणाच्या पोलीस तपासामधून पुढे आली आहे.
पिलीव येथील आकाश खुर्द-पाटील (वय 28) तरुणाचे चांदापुरी (ता. माळशिरस) येथील ‘त्या’ महिलेशी सन 2023 पासून प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधाची कुणकुण 17 वर्षांचा मुलगा आणि नोकरीसाठी परगावी राहात असलेल्या नवऱ्याला लागली होती. आकाश आणि ती संबंधित महिला यांच्या मोबाईल चॅटिंगवरून नवऱ्यासह मुलास दोघांच्या प्रेमसंबंधाबद्दल पक्की खात्री पटली होती. आकाश खुर्द-पाटील याला जीव मारण्याचा त्या तिघांचा प्लॅन नव्हता. बेदम मारहाण केल्यास, जिवाच्या भितीने तो प्रेमसंबंध कायमचे थांबवेल, असा त्यांचा कयास होता. त्यातून त्यांनी आकाशला शेतात बोलावून लोखंडी पाईपने मारहाण केली, हे प्राथमिक तपासातून सिद्ध झाले आहे.
चांदापुरी शिवारात देवदास चोरमले यांच्यासह मायलेकराने शेतात मारहाण करुन आकाश याला पिलीवच्या फॉरेस्टमध्ये आणून टाकले होते. त्याला कोणीतरी पाहतील आणि घरी घेऊन जातील, असा या तिघांनी विचार करुन त्याला मारहाण करत तेथे फेकून दिले होते. शिवाय मारहाणीदरम्यान तो मृत्यूमुखी पडू नये, म्हणून त्याला पिण्यासाठी पाणीदेखील दिले होते, असे माहिती पोलिसांच्या तपासातून निष्पन्न झाली आहे.
जबर मारहाणीतून अंग पडले काळे-निळे
मृत आकाश खुर्द-पाटील याचा शवविच्छेदनाचा अहवाल सोमवारनंतर येणार आहे. मात्र प्राथमिक माहितीनुसार, त्याला लोखंडी पाईपने जबर मारहाण करण्यात आली. अंगात रक्त साकाळले गेले. अंग काळे निळे पडले. लोखंडी सळईने चटके देण्याचा प्रकार घडलेला नाही, असे दिसते, अशी माहिती या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याकडून मिळाली आहे. गुप्तांग कापण्याबद्दल पीएस रिपोर्टमधून माहिती समोर येईल, असेही सांगण्यात आले. याप्रकरणाच्या दाखल फिर्यादीमध्ये मात्र गंभीर मारहाणीसह कशाने तरी पोळवून असा उल्लेख आहे.