छत्रपती संभाजीनगर : एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून पुढे तिची दोन लाख रुपयांत विक्री केल्याचा धक्कादायक प्रकारआता उघडकीस आला आहे. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला असून, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला पोलीस ठाण्यातही स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, 13 मे 2021 रोजी ती अवघ्या 13 वर्षांची असताना तिच्या इच्छेविरुद्ध नात्यातील एका तरुणाशी तिचा बालविवाह घडवून आणला गेला. लग्नानंतर पतीने तिच्यावर शारीरिक अत्याचार केले आणि दारूच्या नशेत मारहाण करण्यास सुरुवात केली. सासूकडूनही तिचा छळ केला जात होता आणि तिला दुसऱ्यांच्या घरी काम करायला लावले जात असे.एप्रिल 2026 मध्ये फुलंब्री येथे मावस सासूच्या घरी असताना, मोबाईल देण्यास नकार दिल्यामुळे पती, सासू आणि मावस सासू यांनी मिळून तिला पुन्हा जबर मारहाण केली.
या अत्याचारांनंतर 10 ऑगस्ट 2026 रोजी पीडितेची आई तिला नाशिक येथे घेऊन गेली. तेथे माधव वाघ नावाच्या व्यक्तीने पंचवटी भागात त्यांच्या राहण्याची सोय केली. त्यानंतर जयवंत कदम याच्याकडून 2 लाख रुपये घेऊन अमोल कदम नावाच्या व्यक्तीशी दुसरे लग्न लावून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. या बहाण्याने मुलीला सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील मानेगाव येथे पाठवून तिची फसवणूक करण्यात आली.सांगोला पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली असता चार वर्षांपूर्वीचा बालविवाह आणि अत्याचार उघडकीस आले

पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिची आई, पती, सासू आणि मावस सासू या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याविरोधात प्रामुख्याने बालविवाह प्रतिबंधक कायदा,पोक्सो कायदा लावण्यात आला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.







