सातारा : साताऱ्यातील पुसेगावमधून एक अत्यंत संतापजनक आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पोलीस ठाण्यात कामासाठी आलेल्या एका महिलेच्या वैवाहिक परिस्थितीचा गैरफायदा घेत एका पोलीस कर्मचाऱ्यानेच तिच्याशी जवळीक साधल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अमोल अशोक लोखंडे असे त्या पोलिसाचे नाव आहे. या घटनेनंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, एक पीडित महिला तिच्या काही वैयक्तिक कामासाठी पुसेगाव पोलीस ठाण्यात गेली होती. तिथे ड्युटीवर असणाऱ्या अमोल लोखंडेने तिच्याशी बोलून ओळख वाढवली. त्यानंतर महिलेच्या घरगुती आणि वैवाहिक अडचणींबद्दल सहानुभूती दाखवण्याचा नाटक केले. स्वतः आधीच विवाहित असतानाही त्याने ही महत्त्वाची माहिती त्या महिलेपासून लपवली. तसेच तिला लग्नाचे खोटे आश्वासन देऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
काही दिवसांनी अमोल लोखंडेचे आधीच लग्न झाले असल्याचे त्या महिलेला समजले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धाव घेत न्याय मागितला. या प्रकरणाची प्राथमिक चौकशी झाल्यानंतर सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. त्यांनी तात्काळ कारवाई करत आरोपी पोलीस अमोल लोखंडे याला निलंबित केले आहे.

पोलिसांवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी असते. मात्र, कायद्याचे रक्षकच जेव्हा अशा गैरकृत्यात गुंततात, तेव्हा संपूर्ण पोलीस दलाची प्रतिमा मलीन होते. शासकीय सेवेत असणाऱ्या व्यक्तीकडून अशा प्रकारच्या अनैतिक आणि बेजबाबदार वर्तनाची अपेक्षा अजिबात केली जात नाही. म्हणूनच पोलीस प्रशासनाने कठोर पाऊल उचलत या खाकी वर्दीला कााळीिमा फाडणाऱ्या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.








