पुणे : ऑक्टोबर महिना संपून नोव्हेंबर सुरू झाला, तरी पुणेकरांना अद्याप अपेक्षित थंडीचा अनुभव घेता आलेला नाही. दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री हलका गारवा, असे संमिश्र हवामान सध्या शहरात पाहायला मिळत आहे. मात्र, पुणेकरांची थंडीची प्रतीक्षा लवकरच संपण्याची शक्यता आहे. पुढील तीन ते चार दिवसांत किमान तापमानात घट होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) वर्तवला आहे. त्यामुळे रात्री आणि पहाटेच्या वेळी शहरातील गारठा वाढण्याची शक्यता आहे.

शहर आणि परिसरात शुक्रवारी दिवसभर आकाश प्रामुख्याने निरभ्र होते. त्यामुळे कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअसवर स्थिर राहिले, तर किमान तापमानात किंचित वाढ होऊन त्याची १९.१ अंश सेल्सिअस नोंद झाली. दिवसा उन्हाची तीव्रता जाणवत असली, तरी सूर्यास्तानंतर आणि पहाटेच्या सुमारास हवेत काहीसा गारवा जाणवत आहे.
शनिवारी शहराचे कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस आकाश मुख्यत्वे निरभ्र राहण्याचा अंदाज असून, किमान तापमानाचा पारा आणखी खाली येऊ शकतो. त्यामुळे पुणेकरांना लवकरच गुलाबी थंडीचा आनंद घेता येणार आहे.

महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत सध्या कोरडे हवामान असून, आकाश निरभ्र आहे. दिवसा उन्हाचा चटका जाणवत असला, तरी रात्रीच्या तापमानात हळूहळू घट होत आहे. पश्चिमेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे रात्री आणि पहाटेच्या वेळी गारवा वाढण्याची शक्यता आहे.
दिवाळीच्या काळात राज्यातील नागरिकांना गुलाबी थंडीचा अनुभव घेता येऊ शकतो. मात्र, दिवसाचे तापमान सामान्य राहण्याचा अंदाज आहे. सध्या राज्यात पावसाचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.







