पुणे : भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले या स्वातंत्र्याची आठवण म्हणून भारतात दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. भारतातील 200 वर्षांहून अधिक काळचा ब्रिटिश सत्तेचा अंत म्हणून हा दिवस ओळखला जातो. त्यामुळे या दिवसाला ऐतिहासिक असे महत्त्व आहे. स्वातंत्र्य दिन हा प्रत्येक भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आहे. कारण या दिवसापासून स्वत:चे प्रशासन, सार्वभौमत्व आणि लोकशाहीच्या नवीन युगाची सुरुवात झाली. त्याचे हे प्रतिक आहे.
देशात स्वातंत्र्य दिन हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शाळा, सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी राष्ट्रध्वज फडकवला जातो आणि लोक सांस्कृतिक कार्यक्रम, परेड आणि ध्वजारोहण समारंभात सहभागी होतात. पंतप्रधान लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करतात, देशाची प्रगती आणि ध्येय प्रतिबिंबित करतात. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज उंचावला आणि अधिकृतपणे भारताला स्वतंत्र राष्ट्र घोषित केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग आणि इतर अनेकांसारख्या असंख्य स्वातंत्र्यसैनिक आणि नेत्यांनी केलेल्या अथक संघर्ष, अहिंसक प्रतिकार आणि बलिदानानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यांच्या या विशेष कार्यामुळेच हा महत्त्वपूर्ण दिवस लाभला आहे.
कायदेशीर सार्वभौमत्व हस्तांतरित
15 ऑगस्ट 1947 ही भारतीय स्वातंत्र्य कायदा लागू होण्याची तारीख आहे. या कायद्याने भारतीय संविधान सभेकडे कायदेशीर सार्वभौमत्व हस्तांतरित करण्यात आले. ज्याला भारतातील जनतेने निवडले होते. ब्रिटिश संसदेने 18 जुलै 1947 रोजी भारतीय स्वातंत्र्य कायदा मंजूर केला. हा कायदा अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा परिणाम होता.
1930 नंतर स्वतंत्रता दिन झाला होता साजरा
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ठरवलं असतं तर 26 जानेवारी हा भारताचा स्वातंत्र्यदिन असता. भारताचे शेवटचे ब्रिटिश वॉईसरॉय माऊंटबेटन यांनी ठरवलं असतं तर भारताचा स्वातंत्र्यदिन 30 जून असता. 1930 नंतरदेखील हा दिवस स्वतंत्रता दिन म्हणून साजराही करण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात स्वातंत्र्यदिन होऊ शकला नाही. पण, 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जात आहे. तर 26 जानेवारी, 1950 मध्ये भारताचं संविधान लागू झालं म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून मानला गेला.
15 ऑगस्ट ही तारीख नेमकी ठरली कशी?
जून 1947 ठरलं की भारताला ऑगस्टपर्यंत स्वतंत्र करायचं. माऊंटबेटन यांनी 15 ऑगस्ट ही तारीख निश्चित केली. या तारखेबाबत माऊंटबेटन म्हणाले, 15 ऑगस्ट हीच तारीख ठरवली कारण याचदिवशी दुसरं महायुद्ध संपताना जपानने आत्मसमर्पण केलं होतं. ‘फ्रीडम अॅट मिडनाईट’ या पुस्तकात माऊंटबॅटन यांच्या विधानाचा उल्लेख आहे. ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यातली तारीख ठरवायची होती हे पक्कं होतं. मग त्यांच्या मनात 15 ऑगस्ट ही तारीख आली. कारण जपानने दुसऱ्या महायुद्धात शरणागती पत्करून दोन वर्षं झाली होती. त्यामुळे 15 ऑगस्ट ही तारीख ठरल्याचे सांगण्यात येते.