दिनेश सोनवणे
दौंड : दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी, घरफोड्याचे प्रमाण वाढले असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन दौंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी केले.
पावसाचे दिवस असल्यामुळे रात्रीच्या वेळी चोरटे घरासमोरील मोटरसायकल चोरी व घरफोडी करीत आहेत. त्या अनुषंगाने सर्व गावातील प्रत्येक नागरिक, तसेच आपल्या वार्डात व प्रत्येक वस्तीवर किमान पाच नागरिकांनी रात्रीच्या वेळी सतर्क राहणे आवश्यक आहे.वार्डनिहाय व वस्तीनिहाय रात्रीच्या वेळी रोज आळीपाळीने किमान पाच नागरिकांनी आपल्या गावच्या वस्तीच्या संरक्षण करिता जागृत राहावे.
रात्रीच्या वेळी दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस पथक गस्त घालीत असून नागरिकांनी मदत लागल्यास तात्काळ पोलिसांना फोन करून सदर ठिकाणी बोलावून घ्यावे दहा मिनिटात पोलीस दाखल होतील.
दरम्यान, नागरिकांनी आपल्या घराचे दारात जी मोटरसायकल लावलेली असते त्या मोटरसायकलला समोरच्या चाकाला लॉक लावावे, योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन दौंड पोलिसांकडून करण्यात आले आहे.