शिरुर : त्या चिमुकल्यांचे मतदानाचे वय नाही. मात्र आपल्या पालकांना मतदानास उद्युक्त करण्यासाठी यांनी आपल्या आई बाबांना पत्र लिहून मतदान करण्याचे आवाहन केले. शिरूर येथील बालाजी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राबविलेले हे अनोखे मतदान जागृती अभियान इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल. असा विश्वास मुख्याधिकारी स्मिता काळे यांनी व्यक्त केला.
मतदानाची घसरत चाललेली आकडेवारी चिंताजनक बाब आहे. सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यातही हे जाणवले. यातून बालाजी इंग्लिश मिडीयम स्कूलचे प्राचार्य गणेश मिटपल्लीवार यांच्या संकल्पनेतून मतदान जागृती अभियान राबविण्यात आले. त्यांनी स्कूल मधील पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले. छोट्या विद्यार्थ्यांना मतदानाविषयी आकलन नसले तरी आपल्या पालकांना मतदान करण्यासाठी पत्र लिहिण्याचे आवाहन मिटपल्लीवार यांनी केले.
विद्यार्थ्यांनीही आपल्या आई-बाबांना पत्र लिहून’ सुदृढ भारतासाठी मतदान करा’ असे आवाहन केले. केवळ पत्रच नव्हे तर समक्षही आई बाबांना मतदान करण्यासाठी हट्ट धरण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले. यावेळी ‘व्होट फॉर बेटर इंडिया ‘च्या घोषणा देण्यात आल्या. मुख्याधिकारी काळे यांनी बालाजी स्कूलने राबवलेल्या या अनोख्या मतदान जागृती अभियानाचे कौतुक केले. हे अभियान निश्चितपणे इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, संविधानाने आपल्याला मतदानाचा अधिकार दिला असून प्रत्येकाने या अधिकाराचा कर्तव्यदक्षपणे वापर करून लोकशाही सशक्त करण्यासाठी योगदान दिले पाहिजे. अशी अपेक्षा बालाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सदाशिवराव पवार यांनी व्यक्त केली.
बालाजी माध्यमिक शाळेचे प्राचार्य विनायक म्हसवडे, रोटरी क्लब,शिक्रापूरचे अध्यक्ष डॉ.मिलिंद भोसुरे,प्रबोधन मंचचे भाऊसाहेब बेंद्रे, राजेद्र चोभे, सेवानिवृत्त उपनिरीक्षक संभाजी तळेकर आदी यावेळी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माया बेंद्रे, मानसिंग कांबळे,साईनाथ टाळे यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनाली मिटपल्लीवार यांनी केले. तर आभार प्रणिता शेळके यांनी मानले.