उरुळी कांचन, (पुणे) : यंदा पुरेसा पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांना विविध संकटांना तोंड द्यावे लागत आहे. अशातच यंदा पावसाने दडी मारल्याने उसाच्या पिकावर हुमणीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे उसाचे उत्पादन घटणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ऊस पिकांत हुमणी किडीच्या प्रादुर्भावेने शेतकऱ्यांना हादरवून सोडले आहे. हलक्या जमिनीतील हुमणी कीड मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. ऊस पिवळा पडू लागला आहे. ऊस हिरवा दिसत असला तरी मुळात पोखरल्याने वाढ खुंटली आहे. हुमणीच्या नियंत्रणासाठी ऊसाला पाटाने पाणी देण्याची गरज असते. पुरेसे पाणी नसल्याने हा उपायही शेतकरी करूच शकत नाहीत. दमट हवामानामुळे लोकरी मावाही काही प्रमाणात दिसत आहे. याचा परिणाम उत्पादन घटण्यावर होणार आहे.
जून महिन्यात पाऊस झाला की ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यापर्यंत पाण्याचा फारसा ताण जाणवत नाही. महिन्यातून एखादे पाणी देऊन उसाची गरज भागवण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. मात्र, यंदा परिस्थिती बदलली आहे. ऊसपट्टयात पाणी साचून रहावे असा पाऊसच झाला नाही. पाण्याची मोठी कमतरता जाणवते आहे. परिणामी, ऊसाची वाढ खुंटली आहे. हुमणीच्या अळ्या पिकांची मुळे खाऊन टाकतात आणि त्यामुळे उसाची बेटे कोलमडून पडतात. ऊसाची मुळे नष्ट झाल्याने ऊस जळून जातो. ऊस पिकासाठी ही कीड अत्यंत धोकादायक मानली जाते.
हुमणीचा ऊस पिकांवर प्रादुर्भाव
पूर्व हवेलीत ऊस हे महत्त्वाचे नगदी पीक आहे. उसाच्या उत्पन्नातून शेतकऱ्यांचे वर्षभराचे अर्थकारण फिरत आहे. मात्र, सध्या परिसरामध्ये ऊस पिकावर हुमणी या किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. ऊसाची मुळे नष्ट झाल्याने ऊस जळून जातो. या किडीच्या नियंत्रणासाठी प्रकाश सापळे लावून त्यामध्ये हुमणी किडीचे प्रौढ पकडले जातात आणि नंतर ते नष्ट केले जातात. पण हा उपाय देखील परिणामी ठरताना दिसत नाही. यावर कृषी खात्याने शेतकऱ्यांना वेळीच मार्गदर्शन करणे गरजेचे झाले आहे.
कोरडेपणा वाढून हुमणी अळीच्या वाढीला पोषक वातावरण
याबाबत बोलताना मंडल कृषी अधिकारी गुलाबराव कडलक म्हणाले, “पावसाळ्यात पाऊस पडण्यास वीस दिवसांपेक्षा जास्त खंड पडला, तर जमिनीतील कोरडेपणा वाढून हुमणी अळीच्या वाढीला पोषक वातावरण तयार झाले आहे. हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते. कृषी विभागाने कीड नियंत्रणासाठी प्रकाश सापळे व औषध फवारणीचा सल्ला शेतकऱ्यांना दिला होता. परंतु पावसाच्या लांबण्यामुळे हा प्रादुर्भाव पुन्हा जोमाने वाढला आहे. त्याला नियंत्रणात आणण्यासाठी शेतकऱ्यांनी सुचवलेल्या उपायांची उपाययोजना करावी.”
…तरीही प्रादुर्भाव जाणवतोय
“पाण्याची कमतरता आणि कमी पाऊस यामुळे जास्त प्रमाणात हुमणीमुळे नुकसान होत आहे. पाण्यातून कीटकनाशक सोडले आहे. तरीही प्रादुर्भाव जाणवत आहे,” असे उरुळी कांचन येथील शेतकरी विजय ढवळे यांनी सांगितले.