मुंबई : राज्य शासनाने जमीन मोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. जमीन मोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना म्हणजेच भूकरमापकांना (सर्वेअर) लॅपटॉप देण्याचा निर्णय घेतला आहे.
जमीन मोजणी करणाऱ्यांना लॅपटॉप दिल्याने जागेवर हद्दी दाखवून मोजणी प्रकरणे तत्काळ निकाली काढणे शक्य होणार आहे. यासाठी ६१४ लॅपटॉप खरेदी करण्यात आले आहे. तसेच पुणे विभागासाठी १४४ लॅपटॉप प्राप्त झाले आहे. नागरिकांना जमीन मोजणीची ‘क’ प्रत लवकर मिळणार असून, कामकाजात देखील गतिमानता येणार आहे.
भूमी अभिलेख विभागाकडून सातत्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. भूमी अभिलेख विभागाचे मुख्य काम जमिनीची मोजणी करून भूमी अभिलेखानुसार जमिनीच्या हद्दी कायम करणे, जमिनीवर झालेली पोटहिस्सा मोजणी करून त्याचे नवीन पोटहिस्सा अभिलेख तयार करणे, प्रत्यक्ष जागेवर जाऊन मोजणी करणे, मोजणी झाल्यानंतर मोजणी नकाशा तयार करणे यासह भूमी अभिलेख त्यावर बसवून हद्दी दाखविणे, जमिनीच्या खुणा दर्शविणे आदी कामे भूकरमापक करतात. या सर्व तांत्रिक बाबी हाताळणे यासाठी लॅपटॉपची आवश्यकता असते. त्यामुळे शासनाने भूकरमापकांना लॅपटॉप देण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच लॅपटॉप पुरविण्यात आले, तर जागेवर हद्दी दाखवून मोजणी प्रकरणे तत्काळ निकाली काढणे सोयीचे होणार आहे. फेरफार प्रकरणे वेळेत मंजूर करणे शक्य होणार आहे. नागरिकांच्या तक्रारी देखील लवकर निकाली काढता येणार आहे. अशी माहिती भूमी अभिलेख विभागाच्या पुणे प्रदेशचे संचालक किशोर तवरेज यांनी दिली आहे.
दरम्यान, भूकरमापक पदासाठी १०२० पदे भूमी अभिलेख विभागाच्या वतीने भरण्यात येणार आहे. ही परीक्षा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचे नियोजन भूमी अभिलेख विभागाकडून करण्यात आले आहे. ही परीक्षा झाल्यानंतर प्रलंबित जमीन मोजणी प्रकरणे निकाली काढण्यात येणार आहे. ही प्रकरणे निकाली काढताना लॅपटॉपमुळे मदत होणार आहे. अशी माहिती देखील अभिलेख विभागाकडून देण्यात आली आहे.